कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची दिशाभूल; सरकारच्या जाचक अटींवर किसान सभेची टीका
राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेवर अखिल भारतीय किसान सभेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी सरकारवर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.
डॉ. नवले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरकारने कर्जमाफीसाठी काढलेल्या शासन आदेशात अत्यंत जाचक अटी व शर्ती घातल्या आहेत. त्यामुळे ही कर्जमाफी आजपर्यंतच्या सर्व कर्जमाफी योजनांपेक्षा अधिक कठोर ठरणार असून अत्यल्प शेतकऱ्यांनाच तिचा लाभ मिळणार आहे.
सन २०१९ मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या सुमारे ३१ लाख २९ हजार शेतकऱ्यांना यावेळी केवळ ५० हजार रुपयांपर्यंतच कर्जमाफी देण्यात येणार असल्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही केवळ ५० हजार रुपयांचा लाभ देण्यात येणार असून त्यासाठी किमान दोन वर्षे नियमित कर्जदार असण्याची अट घालण्यात आली आहे.
याशिवाय सहकार क्षेत्रातील अल्प वेतनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही या योजनेतून वगळण्यात आल्याची टीका करण्यात आली आहे. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र आता २ लाख रुपयांची कर्जमाफी जाहीर करून प्रत्यक्षात बहुसंख्य शेतकऱ्यांना केवळ ५० हजार रुपयांपर्यंत मर्यादित लाभ देण्यात येत असल्याने ही शेतकऱ्यांची घोर फसवणूक असल्याचा आरोप डॉ. नवले यांनी केला आहे.
सरकारने कर्जमाफीच्या अटी शिथिल करून सर्व पात्र शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी किसान सभेने केली आहे.
#LoanWaiver #FarmerNews #MaharashtraNews #BreakingNews #PoliticalNews #Agriculture #FarmerRights #NirbhidVicharNews #NirbhidVichar #MarathiNews #NewsUpdate #ViralNews
