सततच्या वीज खंडितीमुळे शेतकरी हैराण; अखंड ८ तास वीजपुरवठ्याची मागणी मान्य

 


सततच्या वीज खंडितीमुळे शेतकरी हैराण; अखंड ८ तास वीजपुरवठ्याची मागणी मान्य


प्रतिनिधी | शिरपूर


कुरखळी, सावळदे व उंटावद परिसरातील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून शेती पंपासाठी मिळणाऱ्या विस्कळीत आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे प्रचंड त्रस्त झाले होते. आधीच अनियमित पाऊस, वाढलेला उत्पादन खर्च आणि शेतीसमोरील विविध संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणीत महावितरणच्या नियोजनशून्य आणि बेजबाबदार कारभारामुळे आणखी भर पडत असल्याची तीव्र भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत होती.

शेतीसाठी ठरवून दिलेला वीजपुरवठ्याचा कालावधी कमी करणे, वारंवार वीज खंडित होणे आणि खंडित झालेला वेळ भरून न मिळाल्यामुळे पिकांना पाणी देणे कठीण बनले होते. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी एकत्र येत उंटावद सबस्टेशन येथे धाव घेत कनिष्ठ अभियंता गुजराथी साहेब यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या.

यावेळी शेतकऱ्यांनी शेती पंपासाठी अखंड ८ तास वीजपुरवठा द्यावा, तसेच तांत्रिक कारणांमुळे वीज खंडित झाल्यास तो वेळ त्याच दिवशी पुढे भरून द्यावा, अशी ठाम मागणी केली.

शेतकरी प्रतिनिधींनी उपअभियंता किशोर पाटील यांच्याशी दूरध्वनीवरूनही संवाद साधला. शेतकऱ्यांच्या समस्या गांभीर्याने ऐकून घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना शेतकरीहिताची सकारात्मक भूमिका घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या तातडीने मान्य करण्यात आल्या.

या निर्णयानंतर उपस्थित शेतकऱ्यांनी उपअभियंता किशोर पाटील आणि कनिष्ठ अभियंता गुजराथी साहेब यांचे जाहीर आभार मानले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश मोरे, सावळदेचे सरपंच सचिन राजपूत, उंटावदचे सरपंच राजकपूर मराठे, पंचायत समिती सदस्य रामकृष्ण बापू, कुरखळीचे सरपंच किरण धनगर यांच्यासह पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.


शेतकऱ्यांचा सवाल

शेतकऱ्यांना शेतीसाठी नियमित वीजपुरवठा हा मूलभूत हक्क असताना त्यासाठी वारंवार आंदोलनाची भूमिका घ्यावी लागत असेल, तर महावितरणच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण होते.  शेतकऱ्यांना वेळेवर आणि अखंड वीज देण्यात प्रशासन अपयशी ठरत असेल, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केला.

शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या असल्या तरी भविष्यात पुन्हा वीजपुरवठ्याचा लपंडाव सुरू झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी शेतकऱ्यांनी दिला.


#Mahavitaran #FarmersProtest #PowerSupply #Agriculture #Shetkari #MaharashtraNews #Shirpur #Savalde #Untawad #Kurkhali #FarmersIssues #ElectricityCrisis #RuralMaharashtra #NirbhidVichar #BreakingNews


Mahavitaran, Farmers, Agriculture, Power Supply, Shirpur News, Savalde, Untawad, Kurkhali, Maharashtra Farmers, Electricity Issue, Farmer Protest, Rural News, Maharashtra News, Kishor Patil, Gujarati Sir, Dinesh More, Sachin Rajput, Rajkumar Marathe, Kiran Dhangar, Nirbhid Vichar News

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने