अनेर–करवंद पाटचारीस तात्काळ पाणी सोडण्याची मागणी; शिरपूर येथे किसान सभेचे धरणे आंदोलन
शिरपूर | दि. १६ जून २०२६
अनेर व करवंद पाटचारीस तात्काळ पाणी सोडण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा तर्फे आज (दि.१६/०६/२०२६) दुपारी ठीक १२ वाजता पाटबंधारे उपविभाग शिरपूर कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनावेळी उपविभागीय अधिकारी पी. बी. पाटील यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांचे सविस्तर निवेदन देण्यात आले. अनेर व करवंद पाटचारी परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याअभावी मोठ्या प्रमाणात फटका बसत असून तातडीने एक आवर्तन सोडण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी धुळे येथील कार्यकारी अभियंता अग्रवाल यांच्याशी किसान सभेचे नेते हिरालाल परदेशी यांनी मोबाईलवरून संपर्क साधत तात्काळ पाणी सोडण्याची विनंती केली. मात्र शासनाकडून आदेश नसल्याने निर्णय घेता येणार नसल्याचे उत्तर कार्यकारी अभियंत्यांनी दिले. त्याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी पी. बी. पाटील यांनीही “वरिष्ठांचा आदेश मिळाल्याशिवाय पाणी सोडणे शक्य नाही,” अशी स्पष्ट भूमिका मांडली.
किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी ठाम भूमिका घेत सांगितले की, शिरपूर तालुक्यात सध्या पिण्याच्या पाण्याची कोणतीही टंचाई नाही तसेच अनेर व करवंद धरणातील पाणी आरक्षितही नाही. असे असताना शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबवण्यासाठी तातडीने एक आवर्तन सोडणे अत्यावश्यक आहे. अन्यथा पिकांचे न भरून येणारे नुकसान होईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी शासन व पाटबंधारे विभागाची असेल, असा इशारा देण्यात आला.
शासनाने लवकरात लवकर पाणी सोडण्याचे आदेश न दिल्यास सर्व शेतकऱ्यांना एकत्र करून अनेर धरणाच्या उजव्या कालव्याचे पाणी स्वतः सोडण्यात येईल, असा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
अनेर व करवंद धरणाचे पाणी घेणारे बहुसंख्य शेतकरी हे गोरगरीब असून अनेक शेतकरी मजुरी व दुसऱ्याची शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास आत्महत्येसारखी टोकाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. यासाठी संपूर्ण जबाबदारी शासन व पाटबंधारे विभागावर राहील, असेही किसान सभेने स्पष्ट केले आहे.
#अनेरधरण
#करवंदपाटचारी
#शिरपूर
#शेतकरीआंदोलन
#पाणीप्रश्न
Shirpur News
Dhule District News
Aner Dam
Karvand Pat Chari
Farmers Water Issue
