शिरपूर साखर कारखान्याच्या सभेच्या ठिकाणावर आक्षेप,सभासदांचे अध्यक्षांना निवेदन
शिरपूर | प्रतिनिधी :
शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. शिवाजीनगर, दहिवद ता. शिरपूर जि. धुळे येथे दि. 24 जून 2026 रोजी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेच्या ठिकाणाबाबत कारखान्याच्या सभासदांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
दि. 09 जून 2026 रोजी दै. लोकमत वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या नोटीशीनुसार सदर विशेष सर्वसाधारण सभा आर.सी. पटेल संकुलातील राजगोपाल चंदुलाल भंडारी हॉल येथे घेण्यात येणार आहे. मात्र, कारखान्याचे एकूण सभासद सुमारे 17 हजार असताना, संबंधित सभागृहाची आसनक्षमता केवळ 600 ते 700 इतकीच असल्याने हे ठिकाण पूर्णतः अपुरे व अयोग्य असल्याचे सभासदांचे म्हणणे आहे.
सभासदांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कारखाना स्थापनेपासून आजपर्यंत सर्वसाधारण सभा या नेहमीच कारखान्याच्या आवारातच घेण्यात आल्या आहेत. कारखान्याचे आवार प्रशस्त, सुरक्षित व सर्व सभासदांना सोयीचे असल्याने विशेष सर्वसाधारण सभाही तेथेच घेण्यात यावी, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात विशेष सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष मा. श्री. माधवराव आनंदराव पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले असून, सभेचे ठिकाण तात्काळ बदलण्यात यावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
या अर्जावर ॲड. गोपालसिंग रणजितसिंग राजपूत, मोहन साहेबराव पाटील, अशोक बाबुलाल अग्रवाल, सुभाषसिंह शांतीलाल जमादार व शरद मंग पाटील या सभासदांच्या सह्या आहेत. आता यावर कारखाना प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्व सभासदांचे लक्ष लागले आहे.
