मनमाड–इंदूर रेल्वे मार्ग प्रकल्पाला गती; १८ हजार कोटींची महत्त्वाकांक्षी गुंतवणूक
धुळे :
उत्तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाला थेट रेल्वेने जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी मनमाड–इंदूर नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हालचाली वेगवान केल्या आहेत. २ सप्टेंबर २०२४ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रकल्पाच्या उर्वरित सुमारे ३०९ किलोमीटर लांबीच्या भागास मंजुरी दिली असून, संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे १८ हजार ३६ कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
यापूर्वी बोरविहीर–नरडाणा या सुमारे ५१ किमी लांबीच्या पहिल्या टप्प्यातील काम सुरू झाले होते. त्या भागाचा अपवाद वगळून उर्वरित मार्गाला आता अंतिम मंजुरी मिळाल्याने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाला मोठी चालना मिळाली आहे.
हा रेल्वे मार्ग उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि धुळे जिल्ह्यांसह मध्य प्रदेशातील बडवानी, खरगोन, धार आणि इंदूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांतून जाणार आहे. मालेगाव ते महू दरम्यान हा मार्ग राष्ट्रीय महामार्गाच्या समांतर धावणार असून, मनमाड–मालेगाव दरम्यान राज्य महामार्गालगत राहणार आहे. मनमाड येथील प्रमुख रेल्वे जंक्शनशी थेट जोडणी झाल्याने देशातील विविध भागांशी संपर्क अधिक सुलभ होणार आहे, अशी माहिती माजी खासदार सुभाष भामरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रकल्पात एकूण ३४ स्थानके असणार असून त्यापैकी ३० नवीन स्थानके उभारली जाणार आहेत. मध्य प्रदेशात १८ तर महाराष्ट्रात १६ स्थानके प्रस्तावित आहेत. महाराष्ट्रातील मनमाड, मालेगाव, न्यू धुळे, नरडाणा, शिरपूर यांसह अनेक भागांना याचा थेट लाभ होणार आहे.
प्रकल्पासाठी एकूण १७०१ हेक्टर जमीन अधिग्रहण केले जाणार असून त्यात खाजगी, सरकारी व वनजमिनीचा समावेश आहे. महाराष्ट्रात नाशिक व धुळे जिल्ह्यांत सुमारे ७०९ हेक्टर, तर मध्य प्रदेशात सुमारे ९०५ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे.
अभियांत्रिकी दृष्टीनेही हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. मध्य प्रदेशात ७ बोगदे (एकूण १० किमी) आणि महाराष्ट्रात २ बोगदे (३.५ किमी) प्रस्तावित आहेत. तसेच मध्य प्रदेशात १३३ पूल आणि महाराष्ट्रात ९१ पूल उभारले जाणार असून नर्मदा, चंबळ, गिरणा, तापी आणि अरुणावती नद्यांवरील पूल हे महत्त्वाचे अभियांत्रिकी प्रकल्प ठरणार आहेत.
हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर उत्तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील औद्योगिक, कृषी, व्यापारी व पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून धुळे, नाशिकसह संपूर्ण परिसराच्या विकासाला नवा वेग मिळणार आहे.
#ManmadIndoreRailway
#RailwayDevelopment
#IndianRailways
#InfrastructureBoost
#NorthMaharashtra
#MadhyaPradesh
#DhuleNews
#NashikNews
#ConnectivityMatters
#DevelopmentNews
Manmad–Indore Railway Project, Indian Railways, Infrastructure Development, Dhule District, Nashik District, Madhya Pradesh Rail Network, New Railway Line, Transport Connectivity
