पीक विमा थकीत प्रकरणी शिरपूर फर्स्टचे तहसीलदारांना निवेदन; महिन्याभरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा मिळणार
शिरपूर : प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२५ मधील कापूस पिकाचा विमा अनेक शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नसल्याने शिरपूर फर्स्टच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रलंबित पीक विमा प्रश्नावर तहसील कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीस तहसीलदारांसह संबंधित पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी, तालुका कृषी अधिकारी तसेच शिरपूर फर्स्टचे पदाधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी भरलेला हप्ता आणि नुकसान होऊनही अद्याप विमा रक्कम न मिळाल्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचे शिरपूर फर्स्टच्या वतीने निदर्शनास आणून देण्यात आले.
यावेळी शिरपूर फर्स्टच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त करत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा मंजूर करून देण्याची मागणी केली. तसेच वारंवार पाठपुरावा करूनही अनेक शेतकऱ्यांचे दावे प्रलंबित असल्याने संबंधित यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.
यावर पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी अहवाल सादर करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दिली. संबंधित सर्व अहवाल शासनाकडे सादर झाल्यानंतर येत्या महिन्याभरात पात्र व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करण्यात येईल, असे आश्वासन बैठकीदरम्यान देण्यात आले.
शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी शिरपूर फर्स्टचा लढा यापुढेही सुरू राहणार असून, निर्धारित कालावधीत विमा रक्कम न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा पीक विमा वेळेत मिळावा आणि आर्थिक संकटातून दिलासा मिळावा, यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी कापूस उत्पादक शेतकरी, शिरपूर फर्स्टचे पदाधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते..
