एटीएम फसवणुकीचा पर्दाफाश; हरियाणा-उत्तर प्रदेशातील आरोपींना शिरपूर पोलिसांची बेडी

 


एटीएम फसवणुकीचा पर्दाफाश; हरियाणा-उत्तर प्रदेशातील आरोपींना शिरपूर पोलिसांची बेडी


शिरपूर | प्रतिनिधी

एटीएमची अदलाबदल करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला शिरपूर पोलिसांनी अटक करून मोठ्या फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली कार, विविध बँकांची एटीएम कार्डे, तीन मोबाईल फोन तसेच रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

शहरातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये एका ज्येष्ठ नागरिकाचा एटीएम कार्ड बदलून त्यांच्या खात्यातून १७ हजार ३०० रुपये काढण्यात आले होते. याबाबत पीडित नागरिकांनी शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

तपासादरम्यान संशयितांचा माग काढत पोलिसांनी चांदवड (जि. नाशिक) येथील हॉटेलमधून आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये हरियाणा व उत्तर प्रदेशातील चार जणांचा समावेश आहे. चौकशीत आरोपींनी एटीएममध्ये मदतीचा बहाणा करून कार्डची अदलाबदल केल्याची कबुली दिली आहे.

पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली कार, विविध बँकांची एटीएम कार्डे, तीन मोबाईल फोन तसेच रोख रक्कम जप्त केली आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.

या कारवाईमुळे एटीएम फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून नागरिकांनी एटीएम व्यवहार करताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने