धुळे : जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश कारवाईत दोन कोटींचा मुद्देमाल नष्ट



 धुळे : जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश कारवाईत दोन कोटींचा मुद्देमाल नष्ट


धुळे जिल्हास्तरीय प्रादेशिक अंमली पदार्थ नाश समितीच्या वतीने आज (दि. २६) मोठी आणि निर्णायक कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले सुमारे २ कोटी ९ लाख रुपयांचे अंमली पदार्थ कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नष्ट करण्यात आले. या कारवाईत गांजा, अफूची बोंडे, एमडी ड्रग्स, कोडीन सिरप तसेच अल्प्राझोलम गोळ्यांचा समावेश होता.

आंतरराष्ट्रीय नशा विरोधी दिनाचे औचित्य साधून धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या २३ गुन्ह्यांतील गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. ही कारवाई समाजाला नशामुक्त करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

नष्ट करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये

१ कोटी ८० लाख ३० हजार रुपये किंमतीचा ९०१.५०६ किलो गांजा,

२६ लाख ८ हजार ५०० रुपये किंमतीची १७३.९० किलो अफूची बोंडे,

९ हजार ४०० रुपये किंमतीचे ९४ ग्रॅम एमडी ड्रग्स,

३ लाख रुपये किंमतीचे कोडीन कफ सिरप,

तसेच २२० स्ट्रिप अल्प्राझोलम गोळ्या यांचा समावेश आहे.

एकूण २ कोटी ९ लाख ४९ हजार ३८० रुपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.

दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या प्रशासकीय कार्यपद्धतीचे सकारात्मक परिणाम धुळे जिल्ह्यात ठळकपणे दिसून येत आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या वतीनेही गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, नशाविरोधी लढ्यात प्रशासन अधिक आक्रमक झाल्याचे चित्र आहे.

या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या तस्करीवर मोठा आघात बसला असून, जिल्हा नशामुक्त करण्याच्या दिशेने पोलीस व प्रशासनाची ठोस पावले पडत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.



#Dhule

#DrugFreeIndia

#AntiDrugDrive

#DrugDestruction

#WarOnDrugs

#NashaMuktBharat

#MaharashtraPolice

#InternationalAntiDrugDay


Dhule Police, Maharashtra Police, Anti Drug Campaign, Drug Destruction Drive, War Against Drugs

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने