आंतरराज्यीय घरफोडी टोळीचा पर्दाफाश; शिरपूर पोलिसांची कामगिरी
सविस्तर बातमी
शिरपूर शहर व परिसरात घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच शिरपूर शहर पोलीस ठाणे यांनी आंतरराज्यीय घरफोडी टोळीचा पर्दाफाश करत मोठे यश मिळवले आहे. मध्यप्रदेश राज्यातील तिघा सराईत चोरट्यांना अटक करून तब्बल १ लाख ६ हजार ५५० रुपयांचे सोने-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून, या कारवाईमुळे शिरपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
दिनांक १२ मे २०२६ रोजी मध्यरात्री १२.३० ते पहाटे ५.०० वाजेदरम्यान नवे अंतुली (ता. शिरपूर, जि. धुळे) येथे फिर्यादी विलास देविदास ईशी हे कुटुंबासह घराच्या स्लॅबवर झोपले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून ४४,५५० रुपयांचे सोने व चांदीचे दागिने चोरीस नेले होते. या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी तपास पथक गठित करून तपासाला वेग दिला. दरम्यान, सारंगखेडा पोलीस ठाणे (जि. नंदुरबार) येथे दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींचा या गुन्ह्याशी संबंध असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ट्रान्सफर वॉरंटद्वारे आरोपींना ताब्यात घेऊन सखोल चौकशी करण्यात आली.
चौकशीत आरोपी मिठाराम भावसिंग तडवी (वय ३५), रतला मालसिंग मेहडे (वय ३१) आणि जगदीश प्रताप किराडे (वय ३२), सर्व रा. सेंधवा, जि. बडवाणी, मध्यप्रदेश यांनी शिरपूर तालुक्यात घरफोडी केल्याची कबुली दिली. चोरीतील सोने-चांदीचे दागिने सेंधवा येथील सराफा व्यावसायिकांना विकल्याचेही त्यांनी मान्य केले.
त्यानुसार पोलिस पथकाने सेंधवा येथे जाऊन तपास केला असता, सराफांकडून पिवळ्या धातूच्या लगडी, चांदीच्या लगडी व बिस्किटे जप्त करण्यात आली. पुढील चौकशीत आरोपींनी १४ मे २०२६ रोजी बोरगाव (ता. शिरपूर) येथे केलेल्या आणखी एका घरफोडीची कबुली दिली. त्या गुन्ह्यातील दागिनेही हस्तगत करण्यात आले.
या संपूर्ण कारवाईत एकूण १,०६,५५० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, शिरपूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेले दोन घरफोडीचे गुन्हे पूर्णतः उघडकीस आले आहेत.
सदर कामगिरी पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली शिरपर शहर पोलीस ठाणेचे पोलीस
निरीक्षक किशोरकमार परदेशी, पोउनि.हेमंत खैरनार आणि पोलीस अंमलदार रवींद्र आखडमल. अतुल पाटील,गोविंद कोळी, विनोद आखडमल, आरीफ तडवी, मनोज महाजन, सचिन वाघ, योगेश दाभाडे, भटु साळुंके, सोमा ठाकरे, मनोज दाभाडे, प्रशांत पवार तसेच होमगार्ड मिथुन पवार अशांनी केली आहे.
शिरपूर पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे घरफोडी करणाऱ्या टोळ्यांना मोठा धक्का बसला असून, नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
#BreakingNews
#PoliceAction
#CrimeNews
#InterStateGang
#ShirpurPolice
