लेख : १७ जून - महाराणा प्रताप जयंती* *प्राण गेला तरी बेहत्तर, पण शत्रूपुढे झुकणार नाही*

 


*लेख : १७ जून - महाराणा प्रताप जयंती*


 *प्राण गेला तरी बेहत्तर, पण शत्रूपुढे झुकणार नाही* 


मेवाडचे राजा क्रांतीसुर्य *महाराणा प्रतापसिंह सिसोदिया* म्हणजे वीरता,त्याग,धैर्य, बलिदान,चारित्र्य शिकता,राष्ट्रभक्ती व देशाभिमान याचं मूर्तिवंत प्रतिक होय.अशा महापराक्रमी अन् अपराजित राजाचा जन्म बाप्पा रावल यांच्या राजवंशात १७ जून १५४०(तिथीप्रमाणे)रोजी  कुंभलगड येथे झाला अन् जणू हिंदुत्वाचा रक्षणकर्ता क्रांतीसुर्यच भारतभूमीवर उदयास आला. महाराणा प्रताप यांच्या पिताश्रींचे नाव उदयसिंह तर, मातोश्रींचे महाराणी जयवंता कुंवर.


क्रांतीसुर्य महाराणा प्रतापसिंह यांनी बाप्पा रावल,राणा खुमानसिंह,समरसिंह,

राणासंग, राणाकुंभ,उदयसिंह यांच्या शौर्याचा वारसा अखेरच्या श्वासापर्यंत जपला.म्हणूनच ते क्रांतीसुर्य म्हणवले गेले.राणा प्रताप यांचा राज्याभिषेक गोगुंदा येथे संपन्न झाला.मेवाडच्या राजांचे आराध्य दैवत एकलिंग महादेव हे होते. "पारतंत्र्याच्या साखरभाता पेक्षा मला माझ्या स्वातंत्र्यातली मिठभाकर, कंदमुळे पसंद आहेत,असे महाराणा प्रताप हे प्रजेला सांगत असतं.म्हणूनच तर ते ठणकावून सांगत असत की,

"प्राण गेला तरी बेहत्तर,पण शत्रूपुढे झुकणार नाही!".


महाराणा प्रताप यांच्याकडे अकबर बादशहापेक्षा तुलनेत सैन्यबळ व युद्ध सामग्री अत्यल्प असूनही महाराणा प्रताप हे सन १५७६ ते १५८६ या दशकात मोगल सैन्याशी प्राणपणाने लढले. हळदीघाट अन् खमनौरच्या युद्धात वनवासी धनुष्यधारींच्या सहाय्याने अकबर बादशाह व त्याच्या सैन्याला जेरीस आणून त्यांना रणांगणावरून सळो की पळो करून सोडले.


शतकानुशतके भारतीयांच्या हृदयात मानाचं स्थान प्राप्त करणाऱ्या महाराणा प्रतापसिंह सिसोदिया यांनी एक शपथ घेतली होती की," मी बाप्पा रावल यांचा वंशज..माझ्या मातृभूमीला शत्रूपासून मुक्त केल्याशिवाय मी महालात राहणार नाही..सोन्या चांदीच्या भांड्यात भोजन करणार नाही..

राजमहलाच्या शयनगृहात झोपणार नाही.तर वृक्षांची छाया हाच माझा महाल..गवत हाच माझा बिछाना अन् झाडांची पान हीच माझी भोजनाची भांडी राहतील!".


युद्धाच्या वेळी शूरवीर महाराणा प्रताप त्यांच्या अंगावर चिलखत तसेच भाला,तलवार(दोन) व अन्य युद्धाचे साहित्य या सर्वांचे वजन २०८ किलो असायचे.त्यांची उंची साडे सात फूट होती.यावरून त्यांच्या शारीरिक बळाचा अंदाज येतो.राणा प्रतापांचे असे अवाढव्य रूप पाहिल्याने अकबर बादशहांनी आपल्या आख्या जीवनात कधीही राणा प्रतापांसमोर युद्ध करण्याचे धाडस दाखविलं नाही,हे ऐतिहासिक वास्तव आहे.यावरून हे सिद्ध होतं की,अकबर बादशहाच्या मनात राणा प्रतापांबद्दल केवढं मोठं भय होतं.

या पार्श्वभूमीवरच त्यांना *अपराजित राजा* म्हटलं जातं.


महाराणा प्रताप व त्यांच्या कुटुंबियांचे रानावनात वास्तव्य असताना वनवासींनी(आदिवासी समाज) त्यांचे जागोजागी स्वागत करून त्यांच्या राहण्याची-भोजनाची  उत्तम व्यवस्था केली.त्यांच्या कुटुंबियांसाठी रात्रंदिवस पहारा देत डोळ्यात तेल घालून शत्रुपक्षापासून  रक्षण केलं.महत्वाची गोष्ट म्हणजे राणा प्रतापांना युद्धाच्या वेळी त्यांनी पावलोपावली मदतीचा हात दिला.उल्लेखनीय गोष्ट म्हणजे महाराणा प्रताप यांचा धारदार भाला,राजपूत सैनिकांची तळपती तलवार आणि वनवासी सैनिकांच्या तीरकामट्यांच्या वर्षावाने मोगल सैनिकांची दाणादाण उडाली.बारा वर्षे चाललेल्या

 हळदीघाटाच्या

 युद्धात अकबर बादशाह अन् त्यांच्या मोगल सैनिकांना जेरीस आणले.त्यामुळे त्यांनी माघार घेऊन अखेर ते आपल्या राज्यात परतले.संकटसमयी वनवासींनी राणा प्रताप व त्यांच्या सैन्यदलाला  मदतीचा हात दिल्याची इतिहासात नोंद झाली.यासाठीच मेवाडच्या राजचिन्हावर एका बाजूस राजपूत सैनिक तर दुसऱ्या बाजूला वनवासी सैनिकाची प्रतिमा कोरली आहे.या राजचिन्हावरून दोन्ही समाजामधील बंधुत्वाचं नातं प्रतिबिंबित होतं.अत: क्रांतीसूर्य महाराणा प्रताप,निष्ठावान चेतक अन् पराक्रमी वनवासी सेना यांना राजपूत समाजातर्फे त्रिवार मानाचा मुजरा!💐💐💐🙏 


हळदीघाट व अन्य युद्धात संपादन केलेल्या विजयात राणा प्रताप यांच्या *चेतक* अश्वाचा मोलाचा वाटा राहिला.रणांगणावर संकटसमयी स्वतःचा जीव धोक्यात टाकून आपल्या धन्याचे प्राण वाचविणाऱ्या चेतकीची स्वामीनिष्ठा ही अतुलनीय व अवर्णनीय आहे.म्हणूनच राणा प्रताप हे चेतकला आपल्या गळ्याचं ताईत मानत.स्वतः जखमी अवस्थेत असूनही धन्याचे प्राण वाचविण्यासाठी चेतकने ६० फूट लांबीच्या नाल्यावरून छलांग मारली.वास्तवात चेतकचं हे धैर्याचं प्रतिक आहे.कृतज्ञतेच्या भावनेतून राणा प्रताप यांनी चेतकचे *जारोळ* येथे स्मृती स्मारक उभारले.चेतकीची धन्याबद्दलची अपार निष्ठा,निस्सिम भक्ती अन् असामान्य पराक्रमाची नोंद भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरात कोरली गेली.


✍️ *रणवीरसिंह राजपूत ठाणे/नंदुरबार*

*निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी,माहिती व जनसंपर्क,महाराष्ट्र शासन*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने