कोडीदमध्ये विभागीय आयुक्तांचा ग्रामसंवाद दौरा; योजनांच्या अंमलबजावणीचा थेट आढावा

 


कोडीदमध्ये विभागीय आयुक्तांचा ग्रामसंवाद दौरा; योजनांच्या अंमलबजावणीचा थेट आढावा

🗞️ सविस्तर बातमी

कोडीद (ता. शिरपूर) | प्रतिनिधी


शिरपूर तालुक्यातील आदिवासीबहुल कोडीद गावामध्ये आयोजित ग्रामसंवाद कार्यक्रमात विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी गावातील नागरिकांशी थेट संवाद साधत शासनाच्या विविध योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होत आहे याचा सविस्तर आढावा घेतला. शासनाच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचत आहेत का, त्यात कोणत्या अडचणी येत आहेत, याबाबत त्यांनी नागरिकांना प्रश्न विचारून माहिती जाणून घेतली.


या ग्रामसंवादात नागरिकांनी सामाजिक अर्थसहाय्य योजनांमधील ई-केवायसी प्रक्रियेतील अडचणी, तसेच लाडकी बहीण योजना संदर्भातील केवायसी समस्यांबाबत आपली व्यथा मांडली. महिलांनी या अडचणी थेट विभागीय आयुक्तांसमोर मांडत तातडीने मार्गदर्शन व सुलभ उपाययोजना करण्याची मागणी केली.


यावेळी कोडीद गावातील अंगणवाडी सेवांतील अडचणी, तसेच आदिवासी आश्रम शाळेची सद्यस्थिती याबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. शाळा पूर्वतयारी, विद्यार्थ्यांची उपस्थिती, सुविधा व नियोजन यावर विभागीय आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या. यासोबतच वनपट्टेधारकांचे ई-केवायसी, ॲग्री स्टॅग, तसेच पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो का, याचीही त्यांनी चौकशी केली.


कृषी क्षेत्राच्या दृष्टीने कोडीद गावातील मुख्य पिकांची माहिती, खत व बियाणे पुरवठा वेळेवर होतो का, याचा आढावाही घेण्यात आला. शेतकऱ्यांना अडचण येऊ नये यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले.


यानंतर विभागीय आयुक्तांनी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करत आरोग्यसेवांचा दर्जा तपासला. तसेच अंगणवाडी, स्वस्त धान्य दुकान, आणि सेतू केंद्र यांची पाहणी करून तेथील सेवा, मनुष्यबळ व नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या.


“नागरिकांना शासनाच्या विविध सेवांचा लाभ वेळेत आणि अडथळ्याविना मिळाला पाहिजे. त्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिक तत्परतेने काम करणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन विभागीय आयुक्तांनी केले.


या प्रसंगी धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी  बेलदार, उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, शिरपूर तहसीलदार महेंद्र माळी, विकास अधिकारी प्रदीप पवार, कोडीद गावाचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व ग्रामस्तरीय अधिकारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.


ग्रामसंवादातून प्रशासन व नागरिकांमधील थेट संवाद अधिक मजबूत झाला असून, कोडीद गावातील विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने