जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बोराडी येथे चिमुकले, गर्भवती व स्तनदा मातांच्या हस्ते वृक्षारोपण

 


जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बोराडी येथे चिमुकले, गर्भवती व स्तनदा मातांच्या हस्ते वृक्षारोपण


बोराडी, ता. शिरपूर (प्रतिनिधी) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बोराडी ग्रामपंचायत व अंगणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा आगळावेगळा वृक्षारोपण उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात अंगणवाडीतील चिमुकल्या विद्यार्थ्यांसह गर्भवती माता व स्तनदा मातांच्या हस्ते विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.


लहान मुलांच्या कोवळ्या हातांनी लावलेली रोपे आणि मातांनी केलेले वृक्षारोपण हे पर्यावरण संरक्षणाबरोबरच भावी पिढीच्या उज्ज्वल भवितव्याचे प्रतीक ठरले. बालकांचे वय जसजसे वाढत जाईल, तसतसे त्यांच्या हस्ते लावलेले वृक्षही वाढतील. त्यामुळे मुलांमध्ये लहानपणापासूनच निसर्गप्रेम, पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि वृक्षसंवर्धनाची जबाबदारी निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.


यावेळी उपस्थित मान्यवरांनी पर्यावरणाचे महत्त्व, वृक्षांचे मानव जीवनातील योगदान तसेच हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाची गरज याविषयी मार्गदर्शन केले. भविष्यात ही मुले मोठी झाल्यानंतर त्यांनी स्वतः लावलेल्या वृक्षांकडे अभिमानाने पाहतील आणि “हे झाड मी लहान असताना लावले होते” ही आठवण त्यांच्या मनात कायम राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


सरपंच सुखदेव भिल व उपसरपंच राहुल रंधे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य बबन पाटील, सतीश पवार, मनोज सत्तेसा, ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र साळुंखे, आरोग्य सेवक सुजित पावरा, कृषी सहाय्यक हिरालाल अहिरे व सोनवणे, उमेश पावरा, अजय पावरा, गणेश भामरे, आंबादास सगरे, गजू पाटील, भूषण कुलकर्णी, चंद्रकांत बडगुजर, समाधान नगराळे, मुकेश जाधव, विजय पावरा, अभय पावरा, राहुल डूडवे आदी मान्यवर उपस्थित होते.


तसेच अंगणवाडी सेविका लक्ष्मी भिल, गायत्री पावरा, बेबी पावरा, आशा सेविका ममता पाटील, उषा पावरा, सरला पाटील, गर्भवती माता, स्तनदा माता, अंगणवाडीतील विद्यार्थी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांनी लावलेल्या वृक्षांचे नियमित संगोपन करण्याचा संकल्प केला. पर्यावरण संरक्षणाची भावना समाजात रुजविणारा आणि भावी पिढीला निसर्गाशी जोडणारा हा उपक्रम ग्रामस्थांच्या विशेष कौतुकाचा विषय ठरला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने