शीर्षक नाही

 



दोंडाईच्यात HTBT बियाण्यांचा मोठा साठा जप्त; कृषी विभागाची धडक कारवाई


📍 दोंडाईचा | प्रतिनिधी

शिदंखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे प्रतिबंधित HTBT कापूस बियाण्यांची अवैध विक्री करणाऱ्याविरोधात कृषी विभागाने पोलिसांच्या मदतीने मोठी कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे रचलेल्या सापळ्यात आरोपीच्या घरातून तब्बल 46 पाकिटे प्रतिबंधित कापूस बियाणे जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची किंमत 72 हजार 750 रुपये इतकी असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, दोंडाईचा येथील निजाम कमरोद्दिन मन्सुरी हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी प्रतिबंधित HTBT कापूस बियाण्यांची छुप्या पद्धतीने विक्री करत होता. याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर कृषी विभागाने पोलिसांच्या मदतीने त्याच्या राहत्या घरावर छापा टाकला. या कारवाईत “Takkar” आणि “American Cotton” नावाची HTBT कापूस बियाण्यांची 46 पॅकेट्स असलेली दोन पोती जप्त करण्यात आली.

या प्रकरणी कृषी अधिकारी मयुर भामरे यांच्या फिर्यादीवरून दोंडाईचा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात बियाणे कायदा 1966, बियाणे नियम 1968, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, कापूस बियाणे अधिनियम 2009 तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे, कृषी विकास अधिकारी कावेरी राजपूत, मोहीम अधिकारी भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यामध्ये योगेश गिरासे, मयुर भामरे, अक्षय गवांदे, प्रशांत बागल आणि सुदर्शन पाटील यांनी सहभाग घेतला.

दरम्यान, शेतकऱ्यांनी अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावीत तसेच प्रतिबंधित HTBT बियाण्यांच्या वापरापासून दूर राहावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने