“झुरळ कोण? बेरोजगार तरुण की व्यवस्था पोखरणारे सत्ताधारी?”
कॉकरोच जनता पार्टीच्या ट्रेंडमागील संताप, संघर्ष आणि तरुणाईची डिजिटल क्रांती
संपादकीय - महेंद्रसिंह राजपूत
भारताला जगातील सर्वात तरुण देश म्हणून गौरवले जाते. या देशाची तरुणाई हीच त्याची खरी ताकद, ऊर्जा आणि भविष्य आहे. पण आज हीच तरुणाई बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि व्यवस्थेच्या उदासीनतेने होरपळत आहे. त्यातच सत्तेच्या मस्तीत बुडालेल्या काही लोकांनी बेरोजगार तरुणांना “कॉकरोच” म्हणजेच झुरळ अशी उपमा दिली आणि संतापाचा ज्वालामुखी फुटला.
हा फक्त एखाद्या शब्दाचा प्रश्न नव्हता, तर तो लाखो संघर्ष करणाऱ्या तरुणांच्या स्वाभिमानावरचा घाव होता.
पदव्या घेऊन, परीक्षा देऊन, मुलाखतींना सामोरे जाऊन, वर्षानुवर्षे नोकरीसाठी धडपड करणाऱ्या युवकांना जर “झुरळ” म्हटले जात असेल, तर ती केवळ भाषा नसून व्यवस्थेची मानसिकता आहे.
मग काय…
देशातील तरुणांनी आपले सर्वात मोठे शस्त्र उचलले — सोशल मीडिया!
“कॉकरोच जनता पार्टी” ही सुरुवातीला व्यंगात्मक प्रतिक्रिया होती; पण काही तासांतच ती व्यवस्थेविरोधातील तरुणांच्या संतापाची डिजिटल क्रांती बनली. लाखो युवक या मोहिमेशी जोडले गेले. मीम्स, पोस्ट्स, व्हिडिओ, ट्रोल्स आणि जहाल भाष्यांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले गेले. ज्यासाठी मोठ्या राजकीय पक्षांना हजारो कोटींचे आयटी सेल उभे करावे लागतात, ते या देशातील तरुणांनी अवघ्या काही तासांत करून दाखवले.ते ही फुकट..
ही केवळ ट्रेंडिंग नव्हती…
ही व्यवस्थेविरोधातील डिजिटल बंडाची सुरुवात होती.
आज देशातील युवक रागावलेला आहे. कारण त्याने स्वप्न पाहिली होती — शिक्षण घेतले की नोकरी मिळेल, कष्ट केले की भविष्य घडेल. पण वास्तव वेगळे निघाले.
पेपरफुटी झाली…
भरती प्रक्रिया भ्रष्ट झाल्या…
कंत्राटीकरण वाढले…
खासगीकरणाने संधी मर्यादित केल्या…
शिफारशी आणि पैशाशिवाय दारं उघडेनाशी झाली…
देशाची संपत्ती काही मोजक्या उद्योगपतींच्या हातात केंद्रीत होत असताना सामान्य तरुण मात्र रोजगारासाठी दरवाजे ठोठावत फिरतो आहे. अशावेळी त्याला “झुरळ” म्हणणे म्हणजे त्याच्या संघर्षाची थट्टा आहे.
पण खरे झुरळ कोण?
जे शेतकऱ्यांचे अनुदान गिळतात…
जे गरीबांच्या घरकुल योजनांमध्ये भ्रष्टाचार करतात…
जे फाईल हलवण्यासाठी लाच मागतात…
जे जनतेच्या कराच्या पैशावर ऐश करतात…
आणि जे प्रशासनात बसून वाळवीसारखे जनतेचे हक्क कुरतडतात…
जनता त्यांना ओळखून आहे!
आजचा युवक बेरोजगार असू शकतो, पण तो मूर्ख नाही.
तो सोशल मीडियावर जागरूक आहे, प्रश्न विचारतो, सरकारला जाब विचारतो आणि अपमान सहन करत नाही. “कॉकरोच जनता पार्टी” हा त्याच जागरूकतेचा उद्रेक आहे.
लोकशाहीत सरकारवर टीका करणे हा गुन्हा नसतो; उलट ती लोकशाही जिवंत असल्याची खूण असते. सत्ताधाऱ्यांनी तरुणांचा अपमान करण्याऐवजी त्यांच्या प्रश्नांवर उत्तर द्यावे. बेरोजगारी का वाढते आहे? भरती प्रक्रिया पारदर्शक का नाहीत? पेपरफुटी थांबत का नाही? न्यायालयीन निर्णय वेळेवर का येत नाहीत? या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी जर तरुणांना हिणवले जात असेल, तर तो अहंकार लोकशाहीसाठी धोकादायक आहे.
आजची तरुणाई “नोकरी मागणारी पिढी” राहिलेली नाही; ती “हिशोब मागणारी पिढी” बनली आहे.
म्हणूनच “कॉकरोच” हा शब्द आता अपमान राहिलेला नाही, तर व्यवस्थेविरोधातील प्रतिकाराचे प्रतीक बनत चालला आहे. येणाऱ्या काळात ही डिजिटल चळवळ आणखी आक्रमक होईल, यात शंका नाही. कारण ज्यांच्या हातात मोबाईल आहे, त्यांच्या मनात आता भीती नाही — प्रश्न आहेत, संताप आहे आणि बदल घडवण्याची तयारी आहे.
देशातील सत्ताधाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे —
तरुणांना झुरळ समजण्याची चूक इतिहासात अनेक सत्तांनी केली आहे…
आणि प्रत्येक वेळी क्रांतीच जन्माला आली आहे.
