महसूल विभाग थेट जनतेच्या दारी; दहिवद येथे समाधान शिबिराचे यशस्वी आयोजन

 


महसूल विभाग थेट जनतेच्या दारी; दहिवद येथे समाधान शिबिराचे यशस्वी आयोजन

शिरपूर | प्रतिनिधी


महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान अभियान’ अंतर्गत दहिवद ता. शिरपूर येथे बुधवारी (दि. 20 मे) मंडळस्तरीय समाधान शिबिराचे उत्साहात आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या महसूल विभागाशी संबंधित विविध समस्या तत्काळ सोडवून शासनाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचविण्याचा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

मा. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते तथा मा. उपविभागीय अधिकारी शिरपूर शरद मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक व तहसीलदार महेंद्र माळी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती के. डी. पाटील, उपसभापती शेखर पाटील, तहसील विभागातील विविध शाखांचे अधिकारी-कर्मचारी, दहिवद मंडळातील माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, मंडळ अधिकारी, तलाठी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबिरात विविध विभागांच्या माध्यमातून नागरिकांना प्रत्यक्ष सेवा व लाभ वितरित करण्यात आले. सेतू शाखेमार्फत उत्पन्न दाखले, अधिवास प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्रे देण्यात आली. संजय गांधी शाखेकडून मंजूर प्रकरणांची वाटपपत्रे देण्यात आली, तर पुरवठा विभागामार्फत नवीन व दुबार शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आले.

बालविकास विभागाच्या वतीने बेबी किटचे वाटप करण्यात आले. कृषी विभागामार्फत ट्रॅक्टर अनुदान वाटप, माती परीक्षण अहवाल वितरण करण्यात आले. तसेच वनहक्क धारकांचे केवायसी देखील करण्यात आले.

या शिबिरात सुमारे ८०० लाभार्थींनी उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घेतला. शासनाच्या विविध विभागांनी उभारलेल्या स्टॉलना भेट देत नागरिकांनी योजनांची सविस्तर माहिती जाणून घेतली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार महेंद्र माळी यांनी केले. त्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ राबविण्यामागील शासनाचा उद्देश स्पष्ट केला. अध्यक्षीय भाषणात उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक यांनी दहिवद मंडळातील शेतकरी, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांनी या अभियानाचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी दहिवद मंडळातील सर्व तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शासनाच्या या लोकाभिमुख उपक्रमामुळे योजनांची माहिती व लाभ गावपातळीवर उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने