म्हसावद पोलिसांची धडक कारवाई ; ५६ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त



 म्हसावद पोलिसांची धडक कारवाई ; ५६ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त




बातमी :

म्हसावद | प्रतिनिधी

म्हसावद (ता. शहादा) पोलिस ठाणे हद्दीत अवैधरीत्या दारूची वाहतूक व साठा करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत तब्बल ५६ लाख ४४ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी म्हसावद पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुरुवारी गुप्त माहिती मिळाली होती की, म्हसावद ते तोरणमाळ मार्गावरून पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनातून मोठ्या प्रमाणात अवैध दारूची वाहतूक केली जाणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने राणीपूर दिशेकडे सापळा रचला.

रात्री सुमारे साडेआठ वाजेच्या सुमारास संशयित पिकअप वाहन दिसताच पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच चालक व क्लिनरने वाहन रस्त्यावर सोडून अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले.

पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारूसाठा आढळून आला. या कारवाईत पिकअप वाहनासह एकूण ५६ लाख ४४ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, जितेंद्र पाडवी, सजन वाघ, रामेश्वर पाटील, मोहन दमडे, सुनील येवले, सचिन वसावे, पुरुषोत्तम सोनार, यशदीप ओगले आणि राजेंद्र काटके यांच्या पथकाने केली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने