शीर्षक नाही

 



“माझं लग्न का लावत नाही?” म्हणत मुलानेच आईला जिवंत जाळलं; धुळे जिल्हा हादरला



धुळे : ग्रामीण भागात तरुणांची लग्ने न जमण्याची समस्या किती गंभीर होत चालली आहे, याचे सुन्न करणारे वास्तव धुळे तालुक्यातील महिंदळे गावातून समोर आले आहे. स्वतःचे लग्न लावून देत नसल्याच्या संशयातून एका ४५ वर्षीय मुलाने आपल्या ६५ वर्षीय जन्मदात्या आईच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून तिला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत गंभीर भाजलेल्या जिजाबाई भटू खैरनार-पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

याप्रकरणी धुळे तालुका पोलिसांनी आरोपी मुलगा प्रदीप उर्फ दगडू भटू खैरनार-पाटील (वय ४५) याला तात्काळ अटक केली आहे. आरोपी हा व्यवसायाने रिक्षाचालक असून त्याचे लग्न जमत नसल्यामुळे तो मानसिक तणावात होता. आपली आईच लग्न लावून देत नाही, असा संशय त्याच्या मनात निर्माण झाला होता. याच कारणावरून माय-लेकामध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे.


शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास जिजाबाई या घराच्या अंगणात मुलगा प्रदीपची वाट पाहत बसल्या होत्या. त्यावेळी प्रदीप मद्यधुंद अवस्थेत घरी आला. घरी आल्यानंतर त्याने “माझं लग्न का लावून देत नाही?” असा जाब विचारत आईसोबत वाद घालण्यास सुरुवात केली.


वाद विकोपाला गेल्यानंतर संतापाच्या भरात त्याने घरातील ज्वलनशील पदार्थ आणून थेट आईच्या अंगावर ओतला आणि पेटवून दिले. आगीच्या ज्वाळांनी वेढलेल्या जिजाबाई यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांनी धाव घेतली, मात्र तोपर्यंत त्या गंभीररीत्या भाजल्या होत्या. उपचारादरम्यान मृत्यू

घटनेची माहिती मिळताच धुळे Taluka पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. गंभीर भाजलेल्या जिजाबाई यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी प्रदीप उर्फ दगडू खैरनार-पाटील याला अटक केली असून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास धुळे तालुका पोलीस करत आहेत.


आई-मुलाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे महिंदळे गावासह संपूर्ण धुळे जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे. ग्रामीण भागात वाढती बेरोजगारी, लग्न न जमण्याची समस्या, मानसिक तणाव आणि मद्याचे व्यसन यामुळे तरुणांमध्ये अस्वस्थता वाढत असल्याची चर्चा या घटनेनंतर पुन्हा सुरू झाली आहे.


महिंदळे ग्रामस्थांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली असून गावावर शोककळा पसरली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने