साक्री तालुक्यात बिबट्याची दहशत वाढली; बातमी :शतपावली करणारे शेतकरी गंभीर जखमी

 



साक्री तालुक्यात बिबट्याची दहशत वाढली; 

बातमी :शतपावली करणारे शेतकरी गंभीर जखमी


साक्री | प्रतिनिधी


साक्री तालुक्यातील देशशिरवाडे गावात बिबट्याच्या हल्ल्याने पुन्हा एकदा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी रात्री सुमारे ९:२० वाजेच्या सुमारास शतपावलीसाठी गेलेल्या जिभाऊ वाघ (वय ६०) या शेतकऱ्यावर बिबट्याने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून परिसरात घबराट पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिभाऊ वाघ हे रात्री जेवण आटोपल्यानंतर देशशिरवाडे ते ताहाराबाद रस्त्यावर फेरफटका मारण्यासाठी गेले होते. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे जिभाऊ वाघ यांनी मोठ्याने आरडाओरड सुरू केला.

त्यांचा आवाज ऐकताच जवळील शेतात काम करणारे प्रकाश महाजन, मधुकर सोनवणे, धनंजय वंजी आणि सुचित चित्ते हे तातडीने घटनास्थळी धावून आले. ग्रामस्थांनी काठ्या आणि दगडांच्या सहाय्याने बिबट्याचा प्रतिकार केला. त्यामुळे बिबट्या झाडीत पसार झाला आणि जिभाऊ वाघ यांचा जीव थोडक्यात बचावला.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी रात्रीच घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, प्रकाश सोनवणे, प्रमोद सोनवणे आणि सोनू पवार यांनी जखमी शेतकऱ्याला डॉ. प्रशांत गवळी यांच्या मदतीने तातडीने पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

मात्र, बिबट्याच्या हल्ल्यानंतर आवश्यक असलेली ‘अँटी रेबीज’ लस व इतर महत्त्वाची औषधे सरकारी रुग्णालयात उपलब्ध नसल्याने उपचारासाठी प्रतीक्षा करावी लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, परिसरात बिबट्याची दहशत वाढल्याने वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने