शिरपूर विनापरवाना सावकारीवर सहकार विभागाची धडक कारवाई; तिघांविरोधात अधिकृत फिर्याद

 


शिरपूर विनापरवाना सावकारीवर सहकार विभागाची धडक कारवाई; तिघांविरोधात अधिकृत फिर्याद




शिरपूर | प्रतिनिधी


शिरपूर शहरात अवैध सावकारीचे मोठे रॅकेट उघडकीस आले असून, सहकार विभागाने धडक कारवाई करत तिघांविरोधात महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ अंतर्गत अधिकृत फिर्याद दाखल केली आहे. गरजू नागरिकांना अवाजवी व्याजदराने पैसे देत आर्थिक शोषण करून त्यांच्या मालमत्तांवर डल्ला मारल्याचा गंभीर आरोप संबंधितांवर करण्यात आला आहे.


या प्रकरणातील आरोपींमध्ये सुरेश रामचंद्र माळी, नारायण जगन्नाथ मराठे आणि दिलीप बापू पाटील यांचा समावेश आहे. संबंधितांकडून विनापरवाना सावकारी व्यवसाय चालवत अनेक नागरिकांना कर्जाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून जमिनी, घरे आणि दुकाने हस्तगत केल्याचा प्रकार चौकशीत समोर आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

या संदर्भात कदीर अहमद हमीद शेख (रा. मदिना मोहल्ला, शिरपूर) यांनी सप्टेंबर २०२५ मध्ये सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती. संबंधितांकडून मोठ्या व्याजदराने पैसे देऊन व्याजाच्या बदल्यात नागरिकांच्या मालमत्ता बळकावल्या जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.

तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, धुळे यांच्या आदेशानुसार विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली. पोलिस बंदोबस्तात १४ ऑक्टोबर २०२५ रोजी संबंधितांच्या घरांवर झडती घेण्यात आली.

झडतीदरम्यान सुरेश माळी यांच्या घरातून अवैध सावकारीशी संबंधित ११ दस्तऐवज, नोंदवह्या आणि तक्रारदाराच्या नावाचे सहा कोरे धनादेश जप्त करण्यात आले. नारायण मराठे यांच्या घरातून उसनवारी पावत्या, नोंदवह्या, कोरे धनादेश तसेच सौदापावतीची कागदपत्रे आढळून आली. तर दिलीप पाटील यांच्या घरातून थेट कागदपत्रे न मिळाल्यासुद्धा, मराठे यांच्या घरातून जप्त झालेल्या सौदापावतीत त्यांचा सहभाग स्पष्ट झाल्याचे चौकशीत नमूद करण्यात आले आहे.

चौकशीदरम्यान तिन्ही जणांकडे सावकारी व्यवसायासाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. संबंधितांनी दिलेले खुलासे असमाधानकारक ठरले असून, तक्रारदाराने सादर केलेले पुरावे सक्षम असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.

दरम्यान, एप्रिल २०२६ मध्ये जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाईचे आदेश दिल्यानंतर सहाय्यक निबंधक राजेंद्र विरकर यांनी सरकारतर्फे अधिकृत फिर्याद दाखल केली आहे.

या कारवाईनंतर शिरपूर शहरात अवैध सावकारीविरोधात मोठी मोहीम उभी राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अनेक नागरिक पुढे येऊन तक्रारी दाखल करण्याची तयारी करत असल्याची चर्चा असून, आणखी काही धक्कादायक प्रकरणे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

“गरिबांच्या अडचणींचा फायदा घेणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी”

अवैध सावकारीमुळे अनेक कुटुंबे आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत असून, प्रशासनाने अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई करून पीडितांना न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने