‘महा आवास अभियान २०२३-२४’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर; महाराष्ट्रातील सर्वोत्तम जिल्हे, तालुके आणि ग्रामपंचायतींचा गौरव!
बातमी :
मुंबई | प्रतिनिधी
ग्रामीण भागातील गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या विभाग, जिल्हे, तालुके आणि ग्रामपंचायतींचा गौरव करण्यासाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत “महा आवास अभियान २०२३-२४” अंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
ही पुरस्कार वितरण सोहळा १५ मे २०२६ रोजी सैनिक स्कूल, सातारा येथे आयोजित करण्यात आला असून, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री तसेच राज्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.
राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाने जारी केलेल्या पत्रानुसार प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत आवास योजनांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभाग, जिल्हे, तालुके, ग्रामपंचायती तसेच बहुमजली इमारत व गृहसंकुल प्रकल्पांना सन्मानित करण्यात येणार आहे.
पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट विभाग, सर्वोत्कृष्ट जिल्हे, सर्वोत्कृष्ट तालुके, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायती, सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत आणि सर्वोत्कृष्ट गृहसंकुल अशा विविध गटांचा समावेश आहे.
यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत कोकण विभागाने प्रथम, तर राज्य पुरस्कृत आवास योजनांमध्ये नागपूर विभागाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्हास्तरावर गोंदिया, पालघर, नांदेड आणि अमरावती जिल्ह्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
तसेच सातारा, चंद्रपूर, वाशीम, नाशिक, सांगली, अहमदनगर, अकोला आणि पुणे जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींना उत्कृष्ट कार्यासाठी गौरविण्यात येणार आहे.
राज्य शासनाने संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत प्रतिनिधींना कार्यक्रमास उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे या पुरस्कारांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
