नागपूर–मडगाव विशेष एक्स्प्रेसला नियमित दर्जा; रेल्वे बोर्डाची मोठी घोषणा
सविस्तर बातमी
नागपूर | प्रतिनिधी
विदर्भ, खान्देश आणि कोकण प्रांताला थेट जोडणाऱ्या महत्त्वाच्या रेल्वेसेवेला अखेर नियमित स्वरूप प्राप्त झाले असून, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून धावणारी ०११३९/४० नागपूर–मडगाव विशेष एक्स्प्रेस आता नियमित गाडी म्हणून चालविण्यास रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. ही गाडी आता ११२०३/०४ नागपूर–मडगाव एक्स्प्रेस या क्रमांकाने नियमितपणे धावणार असल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विदर्भातून थेट कोकण रेल्वेमार्गावर जाण्यासाठी दीर्घकाळापासून नियमित रेल्वेसेवेची मागणी होत होती. नवरात्र, दिवाळी, नाताळ यांसारख्या गर्दीच्या हंगामात सुरू करण्यात आलेल्या विशेष रेल्वेला प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर अखेर रेल्वे बोर्डाने या गाडीला कायमस्वरूपी मान्यता दिली आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार ११२०३ नागपूर–मडगाव एक्स्प्रेस ही गाडी प्रत्येक बुधवार व शनिवार रोजी नागपूर जंक्शन येथून दुपारी ३.०५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार व रविवार रोजी सायंकाळी ५.४६ वाजता मडगाव (गोवा) येथे पोहोचेल.
तर परतीच्या प्रवासात ११२०४ मडगाव–नागपूर एक्स्प्रेस ही गाडी प्रत्येक गुरुवार व रविवार रोजी मडगाव येथून रात्री ७.०१ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ९.४६ वाजता नागपूर येथे पोहोचणार आहे.
या रेल्वेगाडीला वर्धा जंक्शन, पुलगाव, धामणगाव, बडनेरा जंक्शन, अकोला जंक्शन, शेगाव, मलकापूर, भुसावळ जंक्शन, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण जंक्शन, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, थीवीम आणि करमाळी (गोवा) या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
मात्र, मध्य ते कोकण रेल्वेमार्गावरील वैभववाडी रोड, विलवडे, पेण, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, मूर्तीजापूर आणि चांदूर या स्थानकांवर अतिरिक्त थांबे देण्याची मागणी अद्याप प्रलंबित असून, प्रवासी संघटनांकडून त्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
या नियमित रेल्वेसेवेचे संगणकीय आरक्षण भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळांवर तसेच NTES ॲपवर १७ मे २०२६ पासून सुरू करण्यात आले आहे.
प्रवाशांनी या सेवेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था कल्याण-सावंतवाडी (रजि.) चे संस्थापक अध्यक्ष सुनिल उत्तेकर, समन्वय समिती अध्यक्ष यशवंत परब, संपर्क प्रमुख वैभव बहुतुळे, ओमकार माळगांवकर, नागेश मयेकर, संदेश गांधी तसेच विविध प्रवासी प्रतिनिधींनी केले आहे.
भारतीय रेल्वेच्या भारतीय रेल्वे या निर्णयामुळे विदर्भ, खान्देश, मराठवाडा आणि कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून पर्यटन, शिक्षण, व्यवसाय आणि रोजगाराच्या दृष्टीनेही या रेल्वेसेवेचे महत्त्व वाढणार आहे
