शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल ; अरुण हातेडकर यांना मानाचा पुरस्कार
‘हा पुरस्कार माझ्या गावाचा आणि विद्यार्थ्यांच्या प्रेमाचा’ – अरुण हातेडकर
सविस्तर बातमी
शिरपूर | प्रतिनिधी
शिरपूर येथील आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले शिक्षक अरुण भिकन हातेडकर (हिसाळे) यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय आणि समर्पित कार्याबद्दल प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षक सेवा सन्मान’ जाहीर करण्यात आला आहे. शिक्षक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र शिक्षक पॅनल यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा हा मानाचा पुरस्कार नुकताच शिर्डी येथे आयोजित भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
१२ मे रोजी झालेल्या या विशेष पुरस्कार वितरण सोहळ्यात सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांच्या हस्ते अरुण हातेडकर यांनी आपल्या पत्नीसमवेत हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी प्रसिद्ध कवी रोहित शिंगे आणि गुंजन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या गौरव सोहळ्यास महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे अध्यक्ष दीपक चामे, समन्वयक भास्कर डोसे यांच्यासह शिक्षण, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता वाढविण्यासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न, नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम तसेच सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या कार्याची दखल घेऊन अरुण हातेडकर यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सक्षम शिक्षण देण्यासाठी त्यांनी केलेले कार्य विशेष कौतुकास पात्र ठरले आहे.
पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक सहकारी तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. हा पुरस्कार म्हणजे शिरपूरच्या शैक्षणिक गुणवत्तेवर उमटलेली मानाची मोहोर असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
पुरस्काराबद्दल भावना व्यक्त करताना अरुण हातेडकर म्हणाले की, “हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून माझ्या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, शाळेतील विद्यार्थी आणि सहकाऱ्यांच्या प्रेमाचे प्रतीक आहे. या सन्मानामुळे भविष्यात अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.”
दरम्यान, महाराष्ट्र राज्य किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष अँड. हिरालाल परदेशी, हिसाळेचे सरपंच उत्तम पावरा, उपसरपंच सौ. स्वाती विकास पाटील, माजी उपसभापती संजय संतोष पाटील, बुधा पावरा, अर्जुन कोळी यांच्यासह ग्रामस्थांनी अरुण हातेडकर यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
