आठ तास वीज द्या, अन्यथा तीव्र आंदोलन” – किसान सभेचा महावितरणला अल्टिमेटम




 “आठ तास वीज द्या, अन्यथा तीव्र आंदोलन” – किसान सभेचा महावितरणला अल्टिमेटम




सविस्तर बातमी

शिरपूर | प्रतिनिधी

शिरपूर तालुक्यातील बभळाज सब स्टेशनवरून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या शेतीपंपाच्या वीज पुरवठ्यात करण्यात आलेली एक तासाची कपात त्वरित रद्द करावी, अन्यथा महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने दिनांक १५ मे २०२६ रोजी बभळाज सब स्टेशन येथे शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

किसान सभेच्या म्हणण्यानुसार, बभळाज सब स्टेशन परिसरातील शेतकऱ्यांना पूर्वी आठ तास शेती वीज पुरवठा केला जात होता. मात्र मागील पंधरा दिवसांपासून हा पुरवठा सात तासांवर आणण्यात आला असून, तोही कमी दाबाने आणि वारंवार खंडित स्वरूपात दिला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरेसे पाणी मिळत नसल्याने केळी, पपई तसेच नव्याने लागवड केलेल्या रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

सध्या वाढत्या तापमानामुळे पिकांची पाण्याची गरज वाढली असताना महावितरणकडून करण्यात येणारी वीज कपात शेतकऱ्यांच्या अडचणीत भर टाकणारी ठरत असल्याचा आरोप किसान सभेने केला आहे. विशेषतः उन्हाच्या तीव्रतेमुळे पिके जळण्याची परिस्थिती निर्माण झाली असून, वेळेवर सिंचन न झाल्यास उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.

किसान सभेने प्रशासनाकडे मागणी करताना शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे आठ तास नियमित, सुरळीत आणि जास्त दाबाचा वीज पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. तसेच ही मागणी मान्य न झाल्यास दिनांक १८ मे २०२६ रोजी बभळाज सब स्टेशन कार्यालयासमोर किसान सभेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी परिसरातील सर्व शेतकरी बांधवांना आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने