धुळे पंचायत समितीत तांत्रिक सहाय्यक लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
प्रतिनिधी | धुळे
धुळे पंचायत समिती अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात आलेल्या शेतबांध बांधबंदिस्ती कामाच्या बिलासाठी ७ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तांत्रिक सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे पंचायत समिती परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
लाचखोरी प्रकरणातील आरोपी विश्वजित संजय भामरे (वय ३२) हे पंचायत समिती, धुळे येथे तांत्रिक सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार शेतकऱ्याने मनरेगा अंतर्गत केलेल्या कामाचे बिल काढण्यासाठी आरोपीने ७ हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे केली होती.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी पंचायत समिती कार्यालयात सापळा रचला. यावेळी आरोपीने स्वतः लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.
या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, पद्मावती कलाल, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजन कदम,
मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रविण मोरे, पोकॉ. मकरंद पाटील, प्रविण पाटील, सागर शिर्कें, प्रितेश चौधरी, चंद्रकांत सैदाणे, सागर माळी, रेश्मां परदेशी , सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, पंचायत समितीतील या कारवाईमुळे शासकीय कार्यालयांतील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे.
