शिरपूर तालुक्यात डिजिटल जनगणनेचा शुभारंभ; पहिल्या टप्प्याची तयारी पूर्ण

 


शिरपूर तालुक्यात डिजिटल जनगणनेचा शुभारंभ; पहिल्या टप्प्याची तयारी पूर्ण



बातमी :

शिरपूर | प्रतिनिधी


‘जनकल्याणासाठी जनगणना’ हे ब्रीद घेऊन देशातील 16 वी जनगणना यंदा पूर्णपणे डिजिटल पद्धतीने राबविण्यात येत असून, शिरपूर तालुक्यात पहिल्या टप्प्याची तयारी पूर्ण झाली आहे. घर यादी व लोकसंख्या गणना अशा दोन टप्प्यांत ही प्रक्रिया पार पडणार असून, नागरिकांना 1 मे ते 15 मे दरम्यान स्वगणनेद्वारे स्वतःची माहिती ऑनलाइन पोर्टलवर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

स्वगणना पूर्ण झाल्यानंतर संबंधित नागरिकांना एक युनिक आयडी प्राप्त होणार असून, तो आयडी प्रगणकांना सादर करणे आवश्यक राहणार आहे. त्यानंतर 16 मे ते 14 जून या कालावधीत नियुक्त प्रगणक प्रत्यक्ष घरांना भेट देऊन माहिती संकलित करणार आहेत.

शिरपूर तालुक्यात घर यादी व घरगणना मोहिमेसाठी 575 घर यादी गट निश्चित करण्यात आले असून, त्यासाठी 574 प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच 96 पर्यवेक्षक आणि दहा टक्के राखीव कर्मचारी देखील सज्ज ठेवण्यात आले आहेत.

नियुक्त प्रगणक त्यांच्या मोबाईलमधील HLO (House Listing Operation) ॲपच्या माध्यमातून नागरिकांकडून 33 प्रश्नांची माहिती संकलित करून ती थेट ॲपमध्ये नोंदवणार आहेत. नागरिकांनी दिलेली माहिती जनगणना कायद्यानुसार पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी 10 फिल्ड ट्रेनर्समार्फत 27 एप्रिल ते 7 मे दरम्यान प्रगणकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.

शिरपूर तालुक्यातील सर्व नागरिकांनी घरी येणाऱ्या प्रगणकांना अचूक माहिती देऊन जनगणना मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार तथा चार्ज अधिकारी जनगणना महेंद्र माळी यांनी केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने