शिरपूरात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न; 503 लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ
बातमी :
शिरपूर | प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत आयोजित करण्यात आलेले ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ शुक्रवार (दि. 8 मे) रोजी शिरपूर येथील एस. एम. पटेल सभागृहात उत्साहात संपन्न झाले. या शिबिराला आमदार काशीराम पावरा यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न मंडळ स्तरावर सोडवण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर तसेच उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन आमदार काशीराम पावरा, उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक आणि तहसीलदार महेंद्र माळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती के. डी. पाटील, सरपंच खरदे, महिला व बालकल्याण अधिकारी वैशाली निकम यांच्यासह महसूल विभागातील विविध शाखांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शिबिरामध्ये नागरिकांना विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. सेतू शाखेमार्फत 257 उत्पन्न व डोमिसाईल दाखले वितरित करण्यात आले. संजय गांधी शाखेकडून 37 मंजूर प्रकरणांची वाटप पत्रे देण्यात आली. पुरवठा विभागामार्फत 108 नवीन व दुबार शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. तसेच 53 नागरिकांना 7/12 उतारे व 8-अ वाटप करण्यात आले. भूमी अभिलेख विभागामार्फत 14 मालमत्ता पत्रक सनद व माहिती पत्रके देण्यात आली, तर 34 प्रकरणांमध्ये 7/12 दुरुस्ती करण्यात आली.
या शिबिरात सुमारे 503 लाभार्थींनी उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घेतला. तसेच शासनाच्या विविध योजनांविषयी माहिती घेण्यासाठी नागरिकांनी विविध स्टॉलला भेट दिली.
यावेळी बोलताना आमदार काशीराम पावरा यांनी शासनाच्या योजनांचा लाभ गरजूंपर्यंत प्रामाणिकपणे पोहोचविण्यासाठी अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन केले. उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक यांनी नागरिकांचे प्रश्न तात्काळ सोडविण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तर तहसीलदार महेंद्र माळी यांनी अभियानाचा मुख्य उद्देश स्पष्ट करत शेतकरी, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांनी अशा शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी शिरपूर मंडळातील तलाठी, मंडळ अधिकारी व सरपंच यांनी विशेष परिश्रम घेतले.
