*लेख : ९ मे - महाराणा प्रताप जयंती*
*प्राण गेला तरी बेहत्तर, शत्रुपुढे झुकणार नाही*
✍️ *लेखक - जयकुमार जितेंद्रसिंह रावल*
*कॅबिनेट मंत्री,पणन व राजशिष्टाचार,महाराष्ट्र राज्य*
मेवाडचे राजा क्रांतीसूर्य महाराणा प्रतापसिंह सिसोदिया म्हणजे वीरता,त्याग,धैर्य,बलिदान,
चारित्र्यशिलता,राष्ट्रभक्ती,
देशाभिमान याच़ं मूर्तिमंत प्रतिक होय.अशा महापराक्रमी व अपराजित राजाचा जन्म सिसोदिया राजवंशात ९ मे १५४० रोजी कुंभलगड येथे झाला,अन् जणू हिंदुत्वाचा रक्षणकर्ता
क्रांतीसूर्यच भारतभूमीवर उदयास आला.महाराणा प्रतापसिंह यांच्या पिताश्रीचे नाव राणा उदयसिंह तर मातोश्रीचे महाराणी जयवंता कुंवर.
बाप्पा रावल,राणा खुमानसिंह,समरसिंह, राणासंग,राणाकुंभ,उदयसिंह यांचा वैभवशाली व शौर्याचा वारसा महाराणा प्रतापांनी जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत जपला.म्हणूनच *ते* क्रांतीसुर्य म्हणवले गेले.त्यांचा राज्याभिषेक गोगुंदा येथे संपन्न झाला. मेवाडच्या राजांचे आराध्य दैवत *एकलिंग महादेव* असून,हे मंदिर राणा बाप्पा रावल यांनी उदयपूर येथे ८ व्या शतकात उभारले.मेवाड व चितोड म्हणजेच अखंड राजपुतानाला अकबर बादशहाच्या हुकूमतपासून सुरक्षित ठेवण्यासाठी राणा प्रतापांनी आपलं सारं आयुष्य पणाला लावलं.*प्राण गेला तरी बेहत्तर,पण कोणा शत्रूपुढे झुकणार नाही* ही त्यांची भीष्मप्रतिज्ञा होती.*पारतंत्र्याच्या साखरभातापेक्षा,मला माझ्या स्वातंत्र्यातली मीठभाकरी,कंदमुळे प्रिय आहेत*,असे राणा अभिमानाने सांगत असत. जंगलात वास्तव्याला असताना कोणाचीही लाचारी न पत्करता,घासच्या बियांची भाकरी करून ते आपली भूक शमवत असत.दरम्यानच्या काळात आपल्या कुटुंबियांसाठी त्यांनी कोणापुढे हात पसरविले नाहीत.यालाच खऱ्या अर्थाने स्वाभिमानी बाणा जपणं म्हणतात.यास्तव महाराणा प्रताप यांना जयंती दिनानिमित्त त्रिवार मानाचा मुजरा!जय राणा!💐🙏
महाराणा प्रताप यांच्याकडे अकबर बादशहाच्या तुलनेत सैन्यबळ व युद्धसामग्री अत्यल्प होती.तरीदेखील महाराणा प्रताप हे सन १५७६ ते १५८६ या दशकात मोगल सैन्यांशी प्राणपणाने लढले.हळदीघाट अन् खमनौरच्या युद्धांत वनवासी धनुष्यधारींच्या सहाय्याने अकबर बादशाह व त्याच्या सैन्याला जेरीस आणून त्यांना रणांगणातून माघारी जाण्यास भाग पाडलं.या युद्धादरम्यान वनवासी धनुर्धारींनी राणा प्रतापांना मोलाची साथ दिली.पहाडी क्षेत्रात युद्ध करण्याचे तंत्र केवळ
वनवासींनाच ज्ञात असल्याने त्यांनी पहाडी युद्धतंत्राबाबत अनभिज्ञ असलेल्या मोगल सैनिकांना रणांगणावरून सळो की पळो करून सोडलं.वास्तवात १६ व्या शतकातही *गनिमी कावा* या युद्धतंत्राचा प्रयोग केला गेला,हे निष्पन्न होते.या युद्धादरम्यान पाठीमागून वार करणाऱ्या एका मोगल सरदारावर राणा प्रतापांनी अशा शिताफीने तलवारीचा प्रतीवार केला की,त्या सरदारचे मुंडके अन् त्याच्या घोड्याचे मुंडके एकाच वेळी धडापासून वेगळे होऊन रणभूमीवर पडले.यावरून हे सिद्ध होते की,राणा प्रतापा़ंच्या तलवारीच्या एका वारमध्ये किती प्रबळ शक्ती होती.ते खऱ्या अर्थाने बाहुबली होते,असे म्हणणे संयुक्तिक ठरेल.त्यांच्या पराक्रमी व क्षत्रिय बाण्याला मी वंदन करतो.
शतकानुशतके भारतियांच्या हृदयात मानाचं स्थान मिळविणाऱ्या महाराणा प्रतापसिंह सिसोदिया यांनी एक शपथ घेतली होती की,*मी बाप्पा रावल यांचा वंशज...माझ्या मातृभूमीला शत्रूपासून मुक्त केल्याशिवाय मी महलात राहणार नाही,सोन्या -चांदीच्या ताटात भोजन करणार नाही,राजमहालच्या शयनगृहात झोपणार नाही,तर वृक्षांची छाया हाच माझा महाल,गवत हाच माझा बिछाना अन् झाडांची पानं हीच माझी भोजनाची भांडी राहतील* महत्वाचे म्हणजे राणा प्रतापांचे भारदस्त व्यक्तिमत्त्व कोणाच्याही मनाला भावणारं होतं.धिप्पाड शरीरयष्टी(७ फूट ५ इंच उंची,तर वजन १२० किलो),श्वेतवर्ण,भेदक डोळे, लांब मिश्या,पिळदार भुजा अन् निधडी छाती अशी त्यांची बलदंड देहयष्टी होती.युद्धाच्या वेळी त्यांच्या अंगावर चिलखत तसेच भाला,तलवार(दोन)या युद्ध साहित्याचे वजन सुमारे २०८ किलो असायचे.यावरून त्यांच्या शारीरिक बळाचा अंदाज येतो.दोन तलवारी बाळगण्याचे कारण म्हणजे एक स्वतःसाठी अन् दुसरी निहत्यारी शत्रुसाठी असायची.म्हणजेच शत्रूकडे जर मुकाबला करण्यास तलवार नसेल,तर त्यावर हल्ला न करता,आधी त्याला तलवार द्यायची अन् नंतर त्याच्याशी युद्ध करायचे,हा त्यांचा *क्षत्रिय बाणा* होता अन् यालाच खऱ्या अर्थानं शौर्यवान योद्धा म्हणतात.
*युद्धभूमीवरील राणा प्रतापांचे असे अवाढव्य अन् भारदस्त रूप पाहिल्याने अकबर बादशहांनी आपल्या आख्या*
*जीवनात कधीही राणा प्रतापांसमोर युद्ध करण्याचे धाडस दाखविलं नाही.त्यांच्या जागी अकबर बादशाह हे नेहमी मोगल सरदार राजा मानसिंह किंवा पुत्र सलीम (जहांगीर) यांना युद्धभूमीवर महाराणासमोर उभे करायचे.मात्र स्वतः त्यांनी कधीच महाराणांसमोर थेट युद्ध करण्याचं साहस दाखविलं नाही.यावरून हे सिद्ध होते की,अकबर बादशहाच्या मनात राणा प्रतापांबद्दल केवढं मोठं भय होतं.हा तर खरा करिश्मा होता राणा प्रतापांच्या युद्धकौशल्याचा!या पार्श्वभूमीवरच त्यांना साहसी अन् अपराजित राजा म्हटलं जातं*
हळदीघाटाच्या युद्धात राणा प्रतापचे अंगरक्षक हकीमखां सूर आणि जालौरचा ताजखां या मुस्लिम सरदारांनी तर,चूनावत कृष्ण दास,झाला मानसिंह,झाला बिजा,राणा पुंजा भिल,भीमसिंह रावत सांगा,रामदास,भामाशाह ताराचंद,रामशाह व त्यांचे सुपुत्र शालिवाहन,भगवानसिंह, प्रतापसिंह आदी शूरवीर योद्ध्यांनी मोलाची कामगिरी केली.दरम्यान राणा भामा शाह यांनी राणा प्रतापांना पडतीच्या काळात सैन्य दलाची नव्याने उभारणी करण्यासाठी अन् राष्ट्र रक्षणार्थ आपली संपूर्ण धनसंपत्ती अर्पण केली.यावरून भामाशाहचे औदार्य अन् निस्सीम राष्ट्रप्रेम दृष्टोत्पत्तीस येते.यास्तव त्यांनाही आम्ही सकल भारतीय दंडवत प्रणाम करतो.
राणा प्रताप व त्यांच्या कुटुंबियांचे रानावनात वास्तव्य असताना वनवासींनी त्यांचे जागोजागी स्वागत करून त्यांच्या राहण्याची-भोजनाची व्यवस्था केली.त्यांच्या कुटुंबियांसाठी रात्रंदिवस पहारा देत डोळ्यात तेल घालून शत्रूपक्षापासून रक्षण केलं.महत्वाचे म्हणजे राणा
प्रतापांना युद्धाच्या वेळी पावलोपावली
वनवासींनी मदतीचा हात दिला.उल्लेखनीय गोष्ट म्हणजे महाराणा प्रतापांचा धारदार भाला,राजपुतांची तळपती तलवार आणि वनवासी सैनिकांच्या तीरकामट्यांच्या वर्षावाने अकबराच्या मोगल सैनिकांची दाणादाण उडाली.खरं तर,राणा प्रतापांना त्यांच्या संक्रमण काळात वनवासी अर्थातच भिल्ल समाजाने निष्ठापूर्वक भक्कम पाठबळ दिलं,याची मेवाडच्या इतिहासात नोंद घेतली गेली.यासाठीच मेवाडच्या राजचिन्हावर राजपूत सैनिक आणि वनवासी सैनिकाची प्रतिमा कोरून दोन्ही समाजातल्या बंधुत्वाचं प्रतिक प्रतिबिंबित केलं,याला मेवाड-चितोडचा इतिहास साक्षीदार आहे.
हळदीघाट व अन्य युद्धात संपादन केलेल्या विजयात राणा प्रताप यांच्या *चेतक* अश्वाचा मोलाचा वाटा राहिला.रणांगणावर संकटसमयी स्वतःचा जीव धोक्यात टाकून आपल्या धन्याचे प्राण वाचविणाऱ्या चेतकची स्वामिनिष्ठा अतुलनीय व अवर्णनीय आहे.म्हणूनच राणा प्रताप हे चेतकला आपल्या गळ्याचे ताईत मानत असत.स्वतः जखमी अवस्थेत असूनही २० मीटर लांबीच्या नाल्यावरून छलांग मारून धन्याचे प्राण वाचविण्याची महान कामगिरी चेतकने केली अन् आपली जबाबदारी पूर्ण केल्यावर आपले प्राण सोडले.पण कृतज्ञतेच्या भावनेतून राणा प्रतापांनी चेतकचे *जारोळ* येथे स्मृतीस्मारक उभारले.चेतकची धन्याबद्दलची अपार निष्ठा,निस्सीम भक्ती अन् त्याच्या असामान्य पराक्रमाची नोंद भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली.
मध्यंतरीच्या काळात चेतकच्या शौर्य,धाडस, स्वामीनिष्ठेवर अनेक ग्रंथ लिहिले गेलेत.हीच खरी त्याच्या बलिदानाची पावती होय.एक प्राणी असून चेतक हा स्वामीनिष्ठा जपू शकतो,पण *मानसिंह* हा मानव असूनही स्वामीनिष्ठा राखू शकला नाही,यापेक्षा मोठं दुर्दैव काय! "राजगादीच्या आमिषापोटी मानसिंगने राजपुतानाचा त्याग करून अकबराचं मांडलिकत्व पत्करलं.अशा गद्दार मानसिंगच्या सोबत पंगतीत भोजन करण्यास कोणीही मेवाडच्या नागरिकानं बसू नये",असा फर्मानच राणा प्रतापांनी काढला होता. गद्दार व विश्वासघातकी माणसांबद्दल राणा प्रतापांना भयंकर चिड होती.अशा स्वाभिमानी व पराक्रमी राजाला मी नतमस्तक होतो.
राणा प्रताप यांना स्त्रियांबद्दल नितांत आदरभाव होता.युद्धामध्ये ताब्यात घेतलेल्या शत्रूपक्षाच्या माता-भगिनींना त्यांनी सन्मानपूर्वक त्यांच्या राज्यात परत पोहोचविले.*स्त्री* *सन्मान* ह्या भारतीय परंपरेचा त्यांनी अखेरपर्यंत मान राखला.मेवाडचे महाराजा महाराणा प्रताप आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उज्ज्वल कारकीर्दीत *स्त्री* मग ती राज्यातली असो वा परराज्यातली,तिचा यथेच्छ सन्मान व्हायचा.तिला
मातेसमान दर्जा असायचा.यास्तव या द्वय महायोद्ध्यांना त्रिवार मानाचा मुजरा! जय शिव🚩राणा!
मेवाडचे महाराणा प्रतापसिंह यांच्या शौर्यगाथेबद्दल आपल्या *भारताचा शोध* या कादंबरीत माजी पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतात,*राणा प्रताप हे संकटाचे स्वागत करणारे योद्धे होते*.*म्हणून जोपर्यंत पृथ्वीवर वीरांची पूजा होत राहील,तोपर्यंत राणा*
*प्रतापांचं चिरस्मरण लोकांना राष्ट्रप्रेम व देशाभिमानाचे धडे देत राहील*. "मोडेल पण वाकणार नाही" हा बाणा जीवनभर जपून,राणा प्रतापांनी अकबराचे मांडलिकत्व पत्करलंच नाही.सरदार मानसिंहसह अनेक सरदार एकापाठोपाठ महाराणा प्रताप यांच्याशी बोलणी करण्यासाठी अकबराने पाठविलेत,परंतु सर्वच जण आल्या वाटेनं खाली हात परतले.अर्ध राज्य देण्याचं आमिष अकबराने दाखवूनही महाराणा हे आपल्या ध्येयापासून तसूभरही विचलित झाले नाहीत.वास्तवात यालाच म्हणतात,खरा *आत्मसन्मान अन् *राष्ट्राभिमान*!
महाराणा प्रताप हे एके दिवशी शिकारीला गेले असता घोड्यावरून पडून जबर जखमी झाले.त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडतच गेली.परिणामीस्वरूप त्यांचे ९ जानेवारी १५९७ रोजी चावंड येथे दुःखद निधन झालं अन् भारतमाता एका राष्ट्रप्रेमी शुर योद्ध्याला कायमची मुकली.राणा प्रतापच्या निधनाची खबर जेव्हा अकबर बादशहाच्या कानी पडली.त्या क्षणीच *ते* ताडकन सिंहासनावरून उठले अन् निःशब्द होऊन उभे राहिले.त्या दुःखद घडीला त्यांचे डोळे पाणवले होते.अकबर बादशहा आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले,*मेवाडचा राजा महाराणा प्रताप हा अपराजित राजा होता.तो आयुष्यात कोणापुढे झुकला नाही.अशा शुरवीर योद्ध्याला मी सलाम करतो*.ज्याच्या शौर्यगाथेची मित्रच काय...तर,शत्रूनेदेखील प्रशंसा केली,अशा महापराक्रमी क्रांतीसूर्य महाराणा प्रतापसिंह सिसोदिया यांना मी जयंती दिनानिमित्त त्रिवार वंदन करतो.चला तर,आपण सर्वजण महाराणा प्रताप अन् छत्रपती शिवाजी महाराज या शूरवीर महापुरुषांनी आपल्या रक्ताची आहुती देऊन आपल्या प्राणप्रिय हिंदुस्थान राष्ट्राचे रक्षण केले,त्यास अधिक शक्तिशाली,समृद्ध व सुजलाम सुफलाम करण्यासाठी कटिबद्ध होऊया,म्हणजे हीच या महापुरुषांना खरी आदरांजली ठरेल.जय हिंद!जय राजपुताना!
