चाळीसगावात लाचखोरीचा पर्दाफाश : खाजगी इसम ४ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडला

 


चाळीसगावात लाचखोरीचा पर्दाफाश : खाजगी इसम ४ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडला


चाळीसगाव -


खरेदीखत व सुची क.२ च्या प्रमाणित प्रती देण्यासाठी ९ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या खाजगी इसमाला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  रंगेहात पकडले. ही कारवाई सोमवारी  ०४ मे २०२६ रोजी चाळीसगाव येथे करण्यात आली.

सुनिल शिवदास निकम उर्फ नाना (वय ४७, राहणार आनंदवाडी, चाळीसगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तक्रारदार हे पिलखोड तालुका चाळीसगाव येथील रहिवासी असून त्यांनी त्यांच्या प्लॉटच्या खरेदीखत व सुची क्रमांक २ च्या प्रमाणित नक्कल मिळविण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात अर्ज केला होता.

त्यावेळी कार्यालयात उपस्थित असलेल्या निकम याने या प्रती देण्यासाठी तब्बल ९,००० रुपयांची लाच मागितली. त्यापैकी ५,००० रुपये आधीच घेतले होते, तर उर्वरित ४,००० रुपये नक्कल देताना द्यावे लागतील असे सांगितले होते.

तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत धुळे येथील ACB कार्यालयाशी संपर्क साधला. मिळालेल्या माहितीनुसार ACB पथकाने सापळा रचून पडताळणी केली असता लाचेची मागणी खरी असल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर सापळा कारवाईदरम्यान आरोपी निकम याने तक्रारदाराकडून ४,००० रुपये लाचेची रक्कम स्वीकारताच ACB पथकाने त्याला रंगेहात पकडले. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने