लेख- १ एप्रिल : निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी रणवीर राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त*.... *रणवीर राजपूत- पत्रकारितेचं पावित्र्य जपणारा पत्रकार*

 


*लेख- १ एप्रिल : निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी रणवीर राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त*.... 


*रणवीर राजपूत- पत्रकारितेचं पावित्र्य जपणारा पत्रकार*


जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी,राज्य शासनाच्या गवर्नमेंट मिडियाचे प्रतिनिधी,आमचे परममित्र रणवीर राजपूतसर यांनी १ एप्रिल २०२६ रोजी ७५ व्या वर्षात पदार्पण केलं  आहे.थोडक्यात त्यांनी अमृतमहोत्सवी

(प्लॅटिनम ज्युबली)वर्षात प्रवेश* केल्याबद्दल त्यांचे मनस्वी अभिनंदन अन् पुढील वाटचालीसाठी खुप खूप शुभेच्छा! राजपूतसाहेबांना आरोग्यदायी असं दीर्घायुष्य लाभो,ही आई जगदंबे चरणी प्रार्थना! 


राजपूतसाहेबांनी गेल्या चार दशकांहून अधिक काळापासून सामाजिक बांधिलकीने केलेली पत्रकारिता माझ्या कायम स्मरणात राहील.मी अनुभवलेल्या राजपूत साहेबांनी कधीही आर्थिक फायद्याच्या दृष्टिकोनातून पत्रकारिता केली नाही तर, लोकशिक्षण अन् जनजागृती करण्याच्या उद्देशाने त्यांनी आपल्या लेखणीचा सुयोग्य वापर केला.मध्यंतरीत त्यांना दैनिक अंबरनाथ टाइम्सच्यावतीने आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते *अंबरनाथ भूषण* हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.


सन १९८२ ते १९९४ पर्यंत राजपूतसाहेब हे  अधिपरिक्षक,पुस्तके व प्रकाशने यांच्या कार्यालयात *अनुवादक* म्हणून कार्यरत होते.त्यानंतर त्यांना पदोन्नती मिळून ते मंत्रालयातील माहिती व जनसंपर्क विभागात *उपसंपादक* पदी रुजू झाले.कठोर परिश्रम,प्रामाणिकपणा,

वक्तशीरपणा व पारदर्शकता या गुणवैशिष्ट्यांमुळे त्यांना *क्लास टू(वर्ग-२)चे प्रमोशन* मिळून ते सहाय्यक संचालकपदी नियुक्त झाले. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे त्यांनी प्रत्येक पदाला न्याय देऊन 

सनदी अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन केला.


दरम्यान मुंबई येथील संह्याद्री अतिथीगृहात आयोजित केलेली राज्यस्तरिय माहिती अधिकाऱ्यांच्या परिषदेत तत्कालिन उपमुख्यमंत्री मा.छगन भुजबळसाहेब यांच्या हस्ते राजपूतसरांचा  *गुणवंत अधिकारी पुरस्कार* देऊन गौरविण्यात आले.त्यावेळी माहिती महासंचालक म्हणून भूषण गगरानीसाहेब होते. मी स्वतः ह्याची देही ह्याची डोळा हा सत्कार पाहून धन्य झालो.


तत्कालिन माहिती व जनसंपर्क विभागाच्या महासंचालिका सौ.मनीषा म्हैसकरमॅडम यांच्या कार्यकाळातही राजपूत सरांनी वाखाणण्याजोगं प्रसिद्धीचं काम केलं.त्यांनीही राजपूतांच्या कार्यशैलीचं मुक्तकंठानं कौतुक केलं.राजपूत यांची शासकीय कामावरील निष्ठा, वक्तशीरपणा व कर्तव्यपरायणता याबाबत त्या नेहमी कर्मचाऱ्यांना उदाहरणदाखल सांगून त्यांच्यासारखं वागण्याचा आग्रह धरत असत.या पार्श्वभूमीवरच त्यांना *वरिष्ठ सहाय्यक संचालक(क्लास वन)पदावर पदोन्नती* मिळाली.इतकेच नव्हे तर,त्यांना दोन अतिरिक्त वेतनवाढीदेखील राज्य शासनाने मंजूर केल्या.वास्तवात हीच त्यांच्या प्रामाणिक व कठोर परिश्रमाची फलश्रुती होय.


रायगडचे जिल्हा माहिती अधिकारी असताना त्यांची भेट तेथील एस.पी. प्रतापराव दिघावकर यांच्याशी झाली.एस पी.आणि राजपूतसाहेब व त्यांची प्रसिद्धी विभागाची टीम यांनी संयुक्तपणे *महात्मा गांधी तंटा मुक्ती योजने* अंतर्गत जिल्ह्यातल्या प्रत्येक खेड्यात युद्धपातळीवर काम केलं.ग्रामसभा आयोजित करून गावातील तंटे-वाद जागीच मिटवले.सुदैवाने सदर योजनेच्या कामकाजात *रायगड जिल्हा हा राज्यात प्रथम क्रमांकाने यशस्वी झाला*.त्याकाळी स्व.आर.आर.पाटील उर्फ आबा हे राज्याचे गृहमंत्री होते.त्यांनी दिघावकरसाहेब अन् राजपूतसाहेब यांच्या शासकीय कामकाजाची प्रशंसा करून त्यांचा मंत्रालयात सत्कार केला.विशेष महत्वाचे म्हणजे राजपूतसाहेबांना व्हिडिओ कॉनफरन्सिंगद्वारे सुमारे अर्धा तास आर.आर. आबांशी बोलायची संधी मिळाली.त्याप्रसंगी माहिती महासंचालिका सौ.मनिषा म्हैसकरमॅडम उपस्थित होत्या.खरं तर,राजपूत सरांच्या अत्योत्कृष्ट कामांच्या अनेक गोड आठवणी माझा मनात खोलवर रुजल्या आहेत.


सेवानिवृत्त झाल्यावरही राजपूतसाहेबांनी आपले लेखन कार्य असेच पुढे चालू ठेवले आहे.त्यांच्या मते,*एकदा माणूस संपेल,पण लेखन हे कधीच  संपणारं नाही*.*मानवी जीवनाला मर्यादा असते.पण लेखनकला ही अमर्याद असते*.दरम्यान राजपूतसाहेबांना *महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक महासंघात (फेस्कॉम) सचिव* होण्याची संधी चालून आली.त्या संधीचं देखील त्यांनी सोनं करून दाखविलं.राज्य सरकारकडे ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य,सुरक्षा,एस. टी.प्रवासासाठी सवलती,ज्येष्ठांसाठी वाचनालये,ग्रंथालये, विरूंगळा कट्टे उभारणे,औषधे खरेदीत १० टक्के सूट मिळणे आदी ज्वलंत प्रश्न मोठ्या हिरिरीने मांडून त्याचा पाठपुरावाही केला.सुदैवाने सदर मागण्या तत्कालिन राज्य सरकारने मंजूरही केल्या.याबद्दल राज्यातील ज्येष्ठ नागरिकांनी राजपुतांचे शतशः आभार मानले.


       मध्यंतरीच्या काळात ठाण्यात कोंकण-गोवा राज्यासाठी एकत्रित निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.विषय होता..*ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या व त्यावरील उपाय* या विषयावर सुमारे ३००० शब्दात लेखन करावयाचे होते.सुदैवाने राजपूतसाहेब हे या स्पर्धेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन त्यांना १०० पैकी ८७ गुण मिळालेत.या घवघवीत यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होऊन अभिनंदनाचा वर्षाव झाला.ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त आर.आर.लक्ष्मीनारायण यांच्या हस्ते सन्मानित करून स्मृतीचिन्ह,प्रशस्तीपत्र आणि रोख रुपये पाच हजार हे सर्व पुरस्काराच्या रूपात देण्यात आले.शासकीय सेवेतून रिटायर्ड होऊनही गेल्या १६ वर्षांपासून विविध विषयांवर लेखन करणं सातत्याने चालूच आहे,याचा आम्हा प्रसिद्धी अधिकाऱ्यांना सार्थ अभिमान आहे.वास्तवात हाच त्यांच्या लेखनशैलीतला खरा करिश्मा आहे.


दरम्यान उल्हासनगरहून कल्याण येथे शिफ्ट  झाल्यावर त्यांनी माजी महापौर स्व.कल्याणीताई पाटील आणि माजी महापौर स्व.राजेंद्र देवळेकर यांच्या कडे *प्रेस ॲडव्हायजर* म्हणून सलग पाच वर्षे काम पाहिले.या काळात त्यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विविध योजनांवर विस्तृत लिखाण केले.या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या महासभेत लागोपाठ दोन वर्षे त्यांना *उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार* ने गौरविण्यात आले.इतकेच नव्हे तर,महापालिकेतील बहुजन कर्मचारी संघटनेतर्फे राजपूतसाहेबांना *डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य लेखन पुरस्कार* देऊन सन्मानित करण्यात आले.


मागील वर्षी झालेल्या लोकसभा/विधानसभेच्या निवडणुकींचे प्रसिद्धीचे कामकाज जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून राजपूतसरांनी कुठल्याही प्रकारचे शासकीय भत्ते वगैरे न घेता राष्ट्रीय कर्तव्य म्हणून   केलं,याबद्दल ठाणे जिल्ह्याचे माजी कलेक्टर अशोक शिनगारेसाहेब यांच्या हस्ते प्रेस कॉन्फरन्स मध्ये *प्रशस्ती पत्र* देऊन गौरविण्यात आले.


इतकेच नव्हे तर,

उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे ओ एस डी मंगेश चिवटेसर यांच्या मार्गदर्शनाखाली 

राजपूतसाहेबांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष,उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष अन् डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या आरोग्य विषयक कामकाजाची अन् गोरगरीब रुग्णांच्या महागड्या ऑपरेशन्ससाठी उपलब्ध करून दिलेले  अर्थसहाय्य आणि राज्यात विविध ठिकाणी आयोजित करण्यात येत असलेल्या आरोग्य शिबिरांच्या प्रसिद्धीचे काम 

राजपूतसर हे सामाजिक बांधिलकीच्या नात्याने सातत्याने करत आहेत.या गोष्टींचा विचार करून उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी समारंभपूर्वक त्यांना *कृतज्ञता पत्र* प्रदान करत पाठीवर कौतुकाची थाप दिली.यालाच खऱ्या अर्थानं पत्रकारितेचं पावित्र्य जपणं म्हणतात.


कोरोना जनजागृतीसंदर्भात सातत्याने लेखन केल्यामुळे ना.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोपरी येथील मंगला हायस्कूलमध्ये राजपूतसाहेबांना *कोविड योद्धा सन्मान पुरस्कार* देऊन गौरविण्यात आले.त्यानंतर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने शिवजयंती निमित्त गडकरी रंगायतन सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांचा *शिव छत्रपती सन्मान पुरस्कार* देऊन सत्कार करण्यात आला.


महत्वाचे म्हणजे माजी मुख्यमंत्री अन् आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते पत्रकारिता क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केल्याबद्दल *जीवन गौरव पुरस्कार* बहाल करून राजपूत यांना सन्मानित करण्यात आले.तर,ठाण्याचे माजी महापौर तर आत्ताचे खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते कोरोना जनजागृती करण्याच्या कामात महापालिकेला मोलाचं सहकार्य केल्याबद्दल अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना *ठाणे भूषण पुरस्कार* बहाल करून महापालिकेत सत्कार करण्यात आला.इतकेच नव्हे तर,सुंदर व स्वच्छ शहर या विषयावर महापालिकेने खुली(ओपन) *जिंगल्स स्पर्धा* आयोजित केली होती.त्यातही राजपूत सरांनी पहिला क्रमांक पटकावून अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या हस्ते दहा हजार रुपयांचे बक्षीस प्राप्त केलं.त्यांच्या लेखणीतून भविष्यातही लोकशिक्षण व जनजागृतीचे कार्य असेच अव्याहतपणे होत राहो,ह्याच आम्हा प्रियजन मित्रांच्या सदिच्छा! जय महाराष्ट्र!


*लेखक - मनोज सानप*

*ठाणे जिल्हा माहिती अधिकारी,ठाणे*

*माहिती व जनसंपर्क, मंत्रालय*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने