4,एप्रिलला शिरपूरात धार्मिक एकात्मतेचा सोहळा; शोभायात्रा व भंडाऱ्याची जय्यत तयारी
📰 बातमी:
शिरपूर शहरातील संजीवनी व चंद्रशेखर आझाद वस्तीमध्ये धार्मिक आणि सामाजिक ऐक्य दृढ करण्याच्या उद्देशाने शनिवार, दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता भव्य हिंदू मेळावा व महाप्रसाद (भंडारा) आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमानिमित्त दुपारी ४ वाजता सिद्धिविनायक मंदिर (केवळ अप्पा यांच्या घराजवळ) येथून कार्यक्रमस्थळापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून, परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे.
कार्यक्रमाला प्रमुख संत म्हणून महंत ह.भ.प. बाल ब्रम्हचारी सतिशजी भोंगे महाराज (शिरपूर) यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती प्रितीताई राऊत (मुंबई) व श्री हर्षल प्रविण पाटील (जिल्हा संयोजक, शिवशंभू विचारमंच) हे मार्गदर्शन करणार आहेत.
हा मेळावा ॐ महाबली हनुमान मंदिर, सुभाष कॉलनी, कॉटेज हॉस्पिटलजवळ, शिरपूर येथे पार पडणार असून, चंदन आबा फाउंडेशन व यूथ फ्रेंड सर्कल मित्र मंडळ यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या धार्मिक सोहळ्यास नागरिकांनी सहकुटुंब, मित्रपरिवार व परिसरातील सर्वांना घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
