६ वर्षांच्या लढ्याला यश; चोपड्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांचा ‘रस्त्यावर’ हक्क कायम!
📰 सविस्तर बातमी:
शिरपूर/चोपडा (प्रतिनिधी):
चोपडा तालुक्यातील भावेर शिवारातील १० ते १५ अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या हक्काच्या वहिवाट रस्त्यासाठी सुरू असलेली तब्बल सहा वर्षांची कायदेशीर लढाई अखेर यशस्वी ठरली आहे. उपविभागीय अधिकारी डॉ. शरद मंडलिक यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे प्रस्थापितांनी निर्माण केलेला अडथळा दूर झाला असून, शेतकऱ्यांचा हक्काचा रस्ता कायम ठेवण्यात आला आहे.
शिरपूर-घोडगाव (ता. चोपडा) परिसरातील भावेर शिवारात गट क्रमांक ११५ लगत असलेल्या पारंपरिक वहिवाट रस्त्यावर सन २०२० पासून अडथळे निर्माण करण्यात आले होते. संबंधित जमीन खरेदी केल्यानंतर प्रस्थापित शेतकरी भरत एकनाथ कोळी यांनी या रस्त्यावर बंदी आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे १० ते १५ शेतकऱ्यांची शेतीपर्यंतची वहिवाट बंद झाली होती.
याविरोधात बाधित शेतकऱ्यांनी ‘मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम ५’ अंतर्गत तहसीलदार न्यायालयात अर्ज दाखल केला. मात्र, सुरुवातीला तत्कालीन तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या विरोधात निकाल दिल्याने शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला होता.
न्याय मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष ॲड. हिरालाल परदेशी यांची मदत घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी (SDO) यांच्याकडे रिव्हिजन अर्ज क्र. ३२/२०२० दाखल करण्यात आला.
तत्कालीन SDO प्रमोद भामरे यांनी या प्रकरणाची फेरचौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तहसीलदार महेंद्र माळी यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी व पंचनामा करून शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला.
दरम्यान, संबंधित प्रस्थापित शेतकरी भरत कोळी यांनी पुन्हा एकदा SDO कार्यालयात रिव्हिजन अर्ज क्र. ५३/२०२३ दाखल केला. या वेळी राजकीय व प्रशासकीय दबावातून फेरचौकशीचे आदेश मिळाल्याची चर्चा होती.
अखेर उपविभागीय अधिकारी डॉ. शरद मंडलिक यांच्या न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला. सर्व कायदेशीर बाबींचा सखोल अभ्यास करून २३ मार्च २०२६ रोजी भरत कोळी यांचा अर्ज फेटाळण्यात आला. तसेच तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिलेला शेतकऱ्यांच्या वहिवाटीचा निकाल कायम ठेवण्यात आला.
या निर्णयामुळे घोडगाव, अनवर्दे, बुधागाव आणि भावेर परिसरातील अल्पभूधारक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दीर्घकाळ चाललेल्या संघर्षानंतर न्याय मिळाल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
गोरगरीब शेतकऱ्यांसाठी लढा उभारल्याबद्दल ॲड. हिरालाल परदेशी आणि ॲड. रोशन परदेशी यांचे शेतकरी संघटना व स्थानिक नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.
"गोरगरीब शेतकऱ्यांच्या हक्काच्या रस्त्यासाठी आम्ही कटिबद्ध होतो. कायद्याने दिलेल्या अधिकाराचा वापर करून हा कायमस्वरूपी वहिवाटीचा निकाल मिळवला असून, प्रस्थापितांचा अन्याय दूर झाला आहे."
— ॲड. हिरालाल परदेशी, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य किसान सभा
#FarmersVictory #LegalFight #Chopda #MaharashtraNews #GroundReport #JusticeForFarmers #BreakingNews
