धुळे जिल्हा परिषदेत लाचखोरीचा पर्दाफाश; अधिक्षकाला ३ वर्षांची सक्तमजुरी

 


धुळे जिल्हा परिषदेत लाचखोरीचा पर्दाफाश; अधिक्षकाला ३ वर्षांची सक्तमजुरी



धुळे (प्रतिनिधी):


जिल्हा परिषद बांधकाम विभागातील तत्कालीन कार्यालयीन अधिक्षक पंकज विकम पाटील यांना लाच प्रकरणात दोषी ठरवत धुळे जिल्हा व सत्र न्यायालयाने ३ वर्षे सक्तमजुरी आणि ९० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. या निर्णयामुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे.

सदर प्रकरण २०१६ सालातील असून, तक्रारदाराने ग्रामपंचायत विरदेल (ता. शिंदखेडा, जि. धुळे) येथील अंगणवाडी बांधकाम वेळेत पूर्ण न केल्यामुळे त्यांच्यावर प्रशासकीय कारवाईची नोटीस देण्यात आली होती. ही कारवाई टाळण्यासाठी आणि प्रकरण मिटवण्यासाठी आरोपी पंकज पाटील यांनी तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची लाच मागितली होती.

दि. १६ सप्टेंबर २०१६ रोजी लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्यांना रंगेहात पकडले. या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत ३ वर्षे सश्रम कारावास व ९० हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास ३ महिन्यांच्या साध्या कारावासाची अतिरिक्त शिक्षा देखील सुनावण्यात आली.

सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. देवेंद्र तवर व अ‍ॅड. अजय सानप यांनी प्रभावी युक्तिवाद केला.

दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी कोणी लाच मागत असल्यास तत्काळ तक्रार नोंदवावी. यासाठी टोल-फ्री क्रमांक १०६४ उपलब्ध असून नागरिकांनी निर्भीडपणे पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


📌 टॅग / हॅशटॅग:


#DhuleNews #CorruptionCase #ACBAction #MaharashtraNews #BriberyCase

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने