प्रेमविवाहाचा ‘तालिबानी’ सूड! भररस्त्यात तरुणाची नग्न धिंड; गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न

 


प्रेमविवाहाचा ‘तालिबानी’ सूड! भररस्त्यात तरुणाची नग्न धिंड; गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न


भुसावळ (जळगाव) प्रतिनिधी :


प्रेमविवाह केल्याच्या रागातून माणुसकीला काळिमा फासणारी, अंगावर काटा आणणारी धक्कादायक घटना भुसावळ शहरात उघडकीस आली आहे. एका २५ वर्षीय तरुणाला भरचौकात विवस्त्र करून त्याची धिंड काढत गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला आहे.


निर्दयी मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार, खडका येथील चेतन दिलीप जंगले याने एका १८ वर्षीय तरुणीसोबत प्रेमविवाह केला होता. या विवाहाचा राग मनात धरून मुलीच्या नातेवाईकांनी शुक्रवारी सकाळी सुहास हॉटेल परिसरात सापळा रचला.

सुमारे १० ते १२ जणांच्या टोळक्याने चेतन व त्याच्या पत्नीवर अचानक हल्ला चढवत बेदम मारहाण केली.


हल्लेखोरांनी चेतनला जबरदस्तीने पकडून त्याचे कपडे फाडले आणि भररस्त्यात पूर्णपणे नग्न करून त्याची धिंड काढली.

इतक्यावरच न थांबता, रुमालाने त्याचा गळा आवळून जीवे मारण्याचाही प्रयत्न करण्यात आला.

"पत्नीला सोडून देतो" असे जबरदस्तीने कबूल करून घेत, आरोपींनी क्रौर्याची परिसीमा गाठली.


हल्लेखोरांनी चेतनला रिक्षातून खडका गावात नेऊन पुन्हा विवस्त्र अवस्थेत फिरवले.

त्याच्या कुटुंबीयांनाही बेदम मारहाण करत "घर पेटवून देऊ" अशी उघड धमकी देण्यात आली.

या अमानुष प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.


या हल्ल्यात चेतन गंभीर जखमी झाला असून त्याचा हात मोडला आहे. सध्या त्याच्यावर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.


या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोमल पाटील, हेरंब चौधरी, संजय बढे, विजय पाटील आणि ज्ञानेश्वर भोई या पाच आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक केदार बारबोले यांनी दिली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने