छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्यस्तरीय परिट वधू-वर मेळावा उत्साहात संपन्न
📰 सविस्तर बातमी
छत्रपती संभाजीनगर : परिट (धोबी) समाजाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय उच्चशिक्षित वधू-वर परिचय मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. हा भव्य मेळावा छत्रपती संभाजीनगर येथे दि. १ मार्च २०२६ रोजी संपन्न झाला.
कार्यक्रमास महाराष्ट्राचे सामाजिक न्याय तथा पालकमंत्री संजय शिरसाठ तसेच बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मेळाव्याचे अध्यक्षस्थान अखिल भारतीय धोबी महासंघाचे राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे यांनी भूषविले.
या राज्यस्तरीय मेळाव्यात विविध जिल्ह्यांतील उच्चशिक्षित वधू-वरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. समाजातील तरुण-तरुणींना योग्य जोडीदार निवडीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, तसेच सामाजिक एकोपा वाढविणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता.
यावेळी मंत्री संजय शिरसाठ व मंत्री अतुल सावे यांनी समाजाच्या शैक्षणिक प्रगतीचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे समाजातील एकजूट अधिक दृढ होत असल्याचे सांगितले. अध्यक्ष एकनाथराव बोरसे यांनी समाज संघटित राहून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे मुख्य आयोजक गणेश भिकनराव मढीकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांनी मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
हा मेळावा समाजातील ऐक्य, शिक्षणाची जाणीव आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित करणारा ठरला.
