४०८ लाभार्थ्यांना दिलासा! शिरपूर तहसील कार्यालयात सामाजिक अर्थसहाय्य योजनांना मंजुरी
शिरपूर | प्रतिनिधी
Shirpur येथील तहसील कार्यालयात आज दि. ४ मार्च २०२६ रोजी सामाजिक अर्थसहाय्य योजनांच्या मंजुरीसंदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. सदर बैठकीत विविध योजनांअंतर्गत प्राप्त अर्जांची सखोल छाननी करून पात्र लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली.
बैठकीत शिरपूर तालुक्यातील खालील योजनांअंतर्गत लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली —
संजय गांधी निराधार योजना – १६६
श्रावण बाळ राज्य सेवा निवृत्ती योजना – १८५
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना – ३२
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना – ११
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना – १४
या सर्व योजनांअंतर्गत एकूण ४०८ लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली आहे.
लाभार्थ्यांनी मंजूर आदेश संबंधित सेतू केंद्रातून प्राप्त करून घ्यावेत. तसेच अनुदान मंजुरी आदेश, बँक पासबुकची छायांकित प्रत आणि अद्ययावत आधार कार्डची छायांकित प्रत तहसील कार्यालयातील संजय गांधी शाखेत जमा करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे, जेणेकरून अनुदान वेळेत सुरू करता येईल.
बैठकीत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या की, पात्र लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य वेळेत मिळावे, प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत आणि शासनाच्या सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ गरजू नागरिकांपर्यंत पारदर्शक व प्रभावीपणे पोहोचवावा.
तहसीलदार महेंद्र माळी यांनी सांगितले की, तहसील प्रशासन नागरिकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असून सर्व योजनांची कार्यक्षम आणि पारदर्शक अंमलबजावणी करण्यात येत आहे.
