*आदिशक्ती हॉस्पिटलचा विक्रम – तिन्ही बाळांचा सुरक्षित नैसर्गिक जन्म*
*शिरपूर (प्रतिनिधी) धर्मजित पावरा:*
राम नवमीच्या पवित्र आणि शुभ दिवशी शिरपूर येथील आदिशक्ती मॅटर्निटी व जनरल हॉस्पिटल येथे एक अभिमानास्पद व दुर्मिळ घटना घडली. एका मातेला तिळ्यांचा (तीन बाळांचा) यशस्वी नॉर्मल डिलिव्हरी करण्यात डॉक्टरांच्या टीमला यश आले आहे.
शिरपूर शहराच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारची ट्रिपलेट नैसर्गिक प्रसूती झाल्याने संपूर्ण परिसरात या घटनेचे कौतुक होत आहे. ट्रिपलेट गर्भधारणा ही अत्यंत उच्च जोखमीची मानली जाते. अशा परिस्थितीत सुरक्षित आणि नैसर्गिक पद्धतीने प्रसूती होणे हे वैद्यकीय दृष्ट्या मोठे यश मानले जाते.
या यशस्वी कार्यामध्ये स्त्रीरोगतज्ञ डॉ. दिलबर पावरा, बालरोगतज्ञ डॉ. रोकसिंग पावरा, शल्यचिकित्सक डॉ. सुनील पावरा आणि त्यांच्या संपूर्ण वैद्यकीय टीमने मोलाची भूमिका बजावली.
सुमारे दोन महिन्यांच्या सातत्यपूर्ण देखरेखीखाली, नियमित तपासण्या, योग्य औषधोपचार आणि नियोजनबद्ध उपचार पद्धतीमुळे हा उच्च जोखमीचा गर्भारपण यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला.
राम नवमीच्या शुभ दिवशी या तिन्ही बाळांचा सुरक्षित जन्म हा रुग्णालयासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण ठरला आहे. आई व तिन्ही बाळांची प्रकृती उत्तम असून, त्यांना आवश्यक ती वैद्यकीय सेवा दिली जात आहे.
या घटनेमुळे रुग्णालयाची विश्वासार्हता अधिक दृढ झाली असून, परिसरात डॉक्टरांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राम नवमीसारख्या पवित्र दिवशी घडलेली ही घटना केवळ वैद्यकीय यश नाही, तर मानवी सेवा आणि समर्पणाचे सुंदर उदाहरण आहे.
आजच्या युगात वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञान आणि प्रगती मोठ्या प्रमाणावर झाली असली तरी, प्रत्येक यशस्वी उपचारामागे डॉक्टरांचे समर्पण, संयम आणि रुग्णांप्रती असलेली निष्ठा महत्त्वाची असते.
तिळ्यांची नैसर्गिक प्रसूती ही अत्यंत दुर्मिळ आणि आव्हानात्मक बाब आहे. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी घेतलेले निर्णय, सातत्यपूर्ण निरीक्षण आणि योग्य उपचार यामुळेच आई व तिन्ही बाळांचे प्राण सुरक्षित राहिले.
ही घटना आपल्याला एक गोष्ट शिकवते योग्य वेळी योग्य उपचार, अनुभवी डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि रुग्णालयावर असलेला विश्वास यामुळे कितीही कठीण परिस्थितीवर मात करता येते.
शिरपूरसारख्या शहरात अशी यशस्वी घटना घडणे ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. या यशामागील सर्व डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे.
