प्राथमिक आरोग्य केंद्राचा ढिसाळ कारभार; सांगवी ग्रामस्थ व शिरपूर फर्स्टचा ॲम्ब्युलन्ससह पंचायत समितीत धडक आंदोलन

 


*प्राथमिक आरोग्य केंद्राचा ढिसाळ कारभार; सांगवी ग्रामस्थ व शिरपूर फर्स्टचा ॲम्ब्युलन्ससह पंचायत समितीत धडक आंदोलन*


*सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निष्काळजीपणावर ग्रामस्थांचा रोष; पंचायत समितीत आंदोलन*


*सांगवी आरोग्य केंद्रातील निष्काळजीपणाविरोधात अॅम्ब्युलन्ससह पंचायत समितीवर मोर्चा*


शिरपूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुरू असलेल्या ढिसाळ व निष्काळजी कारभाराविरोधात सांगवी ग्रामस्थ व शिरपूर फर्स्टच्या वतीने ॲम्बुलन्समधून रुग्ण नेऊन पंचायत समिती शिरपूर येथील गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.दिनांक २२ मार्च २०२६ रोजी सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी आलेल्या पूनम राहुल गायकवाड या गरोदर महिलेला सायंकाळी सुमारे ७ वाजता आरोग्य केंद्रात आणण्यात आले होते. मात्र त्या वेळी आरोग्य केंद्र बंद असून वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्याचे आढळले. केवळ सिस्टर नर्स उपस्थित होती. वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी फोनवरून शिरपूर येथे हलविण्याचा सल्ला दिल्याने महिलेला उपचारासाठी शिरपूर येथे हलवावे लागले, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.तसेच, आरोग्य केंद्रात १०२ रुग्णवाहिका उपलब्ध असूनही डिझेल नसल्याचे कारण सांगून रुग्णांच्या नातेवाईकांकडून डिझेल टाकून घेतले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्वच्छतेचा अभाव, कर्मचारी वेळेवर उपस्थित नसणे, गर्भवती महिलांना तपासणी न करता शिरपूर येथे पाठविणे, आरओ प्लांट बंद असणे तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा नसणे अशा अनेक तक्रारी निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.यापूर्वी वाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर अनुपस्थित असल्यामुळे एका गर्भवती महिलेला रस्त्यावरच बाळाला जन्म द्यावा लागल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी घोषणाबाजी करत आरोग्य विभागाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने