AIGCL ला नवे बळ! डॉ. भगवान तलवारे यांची संचालकपदी नियुक्ती
📰 बातमी
नवी दिल्ली | प्रतिनिधी
ऑल इंडिया ग्रामीण क्रिकेट लीग (AIGCL) मध्ये महत्त्वाचा निर्णय घेत डॉ. भगवान तलवारे यांची संचालक (Director) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. AIGCL च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला.
AIGCL च्या अध्यक्षा सुषमा उदयावर पांडे यांनी माहिती देताना सांगितले की, आगामी अखिल भारतीय ग्रामीण क्रिकेट लीगच्या भव्य आयोजनाच्या पार्श्वभूमीवर संघटनेला सक्षम नेतृत्वाची गरज होती. डॉ. तलवारे यांचा अनुभव आणि कार्यक्षमता लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे.
या बैठकीनंतर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, AIGCL चा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील उभरत्या क्रिकेट प्रतिभांना एक मजबूत आणि सर्वसमावेशक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. तसेच युवकांमध्ये टीमवर्क, शिस्त आणि सामाजिक जबाबदारीची भावना वाढवण्यावर संघटनेचा भर राहणार आहे.
AIGCL हे केवळ क्रिकेटपुरते मर्यादित नसून विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता दृढ करण्यासाठीही कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, नव्याने नियुक्त झालेल्या डॉ. भगवान तलवारे यांनी या विश्वासाबद्दल AIGCL च्या केंद्रीय कार्यकारिणी आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे आभार मानले. आपल्या अनुभवाच्या जोरावर संघटनेला पुढील टप्प्यावर नेण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
