*कल्याण-डोंबिवली महापालिका नगरसेवकाचा बोरगांव येथे नागरी सत्कार*
शिरपूर प्रतिनिधी : तालुक्यातील बोरगांव चे मूळ रहिवासी श्री उमेश धोंडू बोरगांवकर हे कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भरगोस मतांनी निवडून आल्याबद्दल बोरगांवकर ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला.
शहरात स्थायिक होऊनही मूळ गावाची आठवण, संस्कृती आणि नाती जपणारी माणसे आजही आपल्या मातीशी जोडलेली आहेत. नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेर राहूनही अनेकजण आपली वाडी, वस्ती आणि संस्कार विसरत नाहीत.
कितीही प्रगती केली तरी गावाची माती, माणुसकी आणि आपली घरे मनाच्या कोपऱ्यात कायम राहतात.
असेच बोरगांव गावातील एक कुटुंब व्यवसायानिमित्त कल्याण येथे स्थायिक झाले. उद्योग व्यवसायात खूप प्रगती केली, 'बोरगांवकर बिल्डर' म्हणून कल्याण शहरात नाव लौकिक केले, पण गावाशी आपली नाड त्यांनी तुटू दिली नाही. गावात कुठलाही सामाजिक कार्यक्रम असो दानशूर बोरगांवकर कुटुंब नेहमी मदतीसाठी पुढे असतं.
श्री उमेश धोंडू बोरगांवकर हे कल्याण डोंबिवली महापालिकेत तिसऱ्यांदा निवडून जात आहेत. यावेळी त्यांची गटनेता पदी निवड करण्यात आली. हा क्षण बोरगांवकर ग्रामस्थांसाठी गौरवाचा होता म्हणून ग्रामस्थांनी बोरगांवकर कुटुंबाला गावात बोलवून सत्कार केला. गावासाठी बोरगांवकर कुटुंबाचे बिल्डर श्री संजय धोंडू बोरगांवकर यांनी महादेव मंदिरासाठी लाखाची मदत केली आहे. तसेच गावात समाज मंदिराचे काम चालू आहे त्यासाठी देखील भरपूर आर्थिक मदत बोरगांवकर कुटुंब करीत आहेत.
सत्कारा वेळी बोरगांवचे माजी सरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया, माजी सैनिक दगेसिंग मोहनसिंग राजपूत, पोलीस पाटील मनोहर पाटील, नाभिक समाजाचे तालुकाध्यक्ष गोकुळ चिंधा न्हावी, विठ्ठल झुलाल कोळी, माजी सरपंच दीपक पदमसिंग राजपूत, जगतसिंग नारायण राजपूत, राजेश धोंडू बोरगांवकर, सखाराम निळकंठ न्हावी, अमोल राजपूत, बाबुराब बोरगांवकर, दगा बुधा तिरमले, जयराम पोपट पाटील, सुभाष न्हावी, संजीव सजन पाटील, प्रकाश न्हावी, रामचंद्र कोळी, भानुदास न्हावी, कुंदन न्हावी, दिनेश न्हावी, गोलू भिल तसेच महिला, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार प्रदर्शन माजी सरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांनी केले.
