हिंद की चादर' गुरु तेगबहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समारंभ सोहळ्यास गोर - बंजारा समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे !* *– धर्मरक्षक किसनभाऊ राठोड*




*▪️'हिंद की चादर' गुरु तेगबहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समारंभ सोहळ्यास गोर - बंजारा समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे !*

      *– धर्मरक्षक किसनभाऊ राठोड*


*मुंबई* - प्रतिनिधी :

    भारतीय गोरबंजारा, लभाणा आणि शीख समाजाचा इतिहास हा त्याग, बलिदान, शौर्य, पराक्रमाचा रक्तरंजित इतिहास आहे. मानवतेच्या रक्षणासाठी स्वतःचे प्राण अर्पण करणारे ‘हिंद की चादर’ गुरु तेगबहादूर साहिबजी हे भारताच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ शहिदांपैकी एक आहेत‌. त्यांनी धार्मिक स्वातंत्र्य, सत्य आणि सहिष्णुतेसाठी दिलेले बलिदान हे मध्ययुगीन भारतीय इतिहासात अजरामर झाले आहे. त्यांच्या शौर्यशाली पराक्रमात बाबा लखीशाह बंजारा यांचेही अद्वितीय योगदान आहे. बंजारा समाजाचा गौरवांकित इतिहास त्याग, बलिदान, शौर्य पराक्रम इत्यादी गुणांनी समृद्ध आहे.

   धर्माभिमानी व्यापारी माखनशाह लभाणा यांनी १६ एप्रिल १६६४ रोजी बकाला येथे गुरु तेगबहादूर साहिब यांचा शोध लावून त्यांना शिख धर्माचे नववे गुरु म्हणून सर्वमान्यता मिळवून दिली. त्यांच्या या कृतीने गुरुभक्ती, श्रद्धा आणि निष्ठेचा असा तेजस्वी दीप प्रज्वलित केला, जो आजही शिख इतिहासात उजळत आहे.

   भाई मक्खनशाह लभाणा यांचा दिल्लीतील व्यापार बाबा लाखीशाह बंजारा पाहत असत. दोघेही गुरुसेवक व श्रद्धावान बंजारा शिख होते. गुरु तेगबहादूर यांच्या शहादतीनंतर भाई लाखीशाह यांनी त्यांचे अंत्यसंस्कार करून भक्ती व धैर्य , शौर्याचा महान इतिहास घडविला.

  मध्ययुगीन भारताच्या इतिहासात १६ व्या शतकातील मुघल राजवटीच्या काळात हिंदू धर्माचा त्याग करून इस्लाम स्वीकारावा, अन्यथा ठार मारले जाईल — असा अत्याचार सुरू झाला होता. त्या काळात अनेकांवर धर्मांतराचा दबाव आणण्यात येत होता. अशा वेळी गुरु तेगबहादूर यांनी निर्भयतेने मुघल सत्तेला ठणकावून सांगितले — “मी शहिद झालो तरी चालेल, पण इस्लाम धर्म कदापिही स्वीकारणार नाही आणि इतर हिंदूंचेही धर्मांतर होऊ देणार नाही.” त्यांच्या या धर्मरक्षणासाठीच्या ठाम भूमिकेमुळे संतप्त मुघल सत्ताधीशांनी दिल्लीच्या चांदणी चौकात हजारो लोकांसमोर त्यांचा शिरच्छेद करून निर्दयतेने वध केला.

तसेच असे जाहीर करण्यात आले की, “जो कोणी गुरु तेगबहादूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करेल, त्याचाही तसाच अंत होईल.” पण त्या भीषण परिस्थितीतही बंजारा समाजातील शूरवीर आणि धर्मनिष्ठ योद्धा बाबा लखीशाह बंजारा यांनी अद्वितीय धैर्य दाखवले. त्यांनी निर्भयतेने गुरु तेगबहादूर यांचे पार्थिव उचलून आपल्या घरात आणले आणि स्वतःचे घर पेटवून गुरुंचे अंत्यसंस्कार केले. त्यांच्या या कृतीने गुरुभक्ती, निष्ठा आणि त्यागाचे अमर उदाहरण इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले.

   गुरु तेगबहादूर यांच्या बलिदानामुळे आणि बाबा लखीशाह बंजारा यांच्या पराक्रमामुळे शिख व बंजारा समाजाचा इतिहास अधिक तेजस्वी झाला आणि भारतीय संस्कृतीत श्रद्धा, सत्य आणि त्यागाचा नवा अध्याय लिहिला गेला.

   धर्म आणि देशभक्तीच्या या अद्वितीय परंपरेचा गौरव करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरु तेगबहादूर यांच्या ३५० व्या शहिदीदिनानिमित्त भव्य स्मृतिसोहळे नांदेड, नवी मुंबई, नागपूरसह देशात विविध ठिकाणी होत आहेत. या ऐतिहासिक कार्यक्रमात गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

   या उपक्रमासाठी महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय समन्वय समिती स्थापन केली असून, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख मा. रामेश्वरभाऊ नाईक यांच्या  मार्गदर्शनाखाली ती प्रभावीपणे कार्यरत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जगदीश सकवान हे कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. महाराष्ट्र शासनाने सर्व विभागांना अधिकृत परिपत्रक जारी केले असून, राज्यस्तरावर या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. ही शासन नियुक्त समिती विविध स्तरांवर समन्वय, प्रचार व प्रसाराचे कार्य यशस्वीपणे पार पाडत आहे.

    धर्मरक्षक किसनभाऊ राठोड यांनी सांगितल्याप्रमाणे या सोहळ्यामुळे बंजारा, लभाणा आणि शिख समाज यांच्यातील शतकानुशतकांचे गुरुबंधुत्व आणखी दृढ होईल. “गुरु तेगबहादूर आणि बाबा लखीशाह बंजारा यांचे बलिदान व योगदान हे धर्म आणि मानवतेच्या रक्षणाचे तेजस्वी प्रतीक आहे. त्यांच्या शौर्याचा आणि श्रद्धेचा गौरव या स्मृतिसोहळ्याद्वारे पुन्हा उजाळा घेणार आहे.”

   या कार्यक्रमामुळे बंजारा समाजाच्या गौरवशाली, पराक्रमी आणि धर्मनिष्ठ इतिहासाला नवे बळ मिळणार असून गुरुबंधुत्वाचा हा पवित्र वारसा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने