हंसराज चौधरी प्रकरण म्हणजे लोकशाहीवर उघड प्रहार!" शेतकरी विकास फाऊंडेशन कडून जाहीर निषेध

 


 हंसराज चौधरी प्रकरण म्हणजे लोकशाहीवर उघड प्रहार!" शेतकरी विकास फाऊंडेशन कडून जाहीर निषेध 


शिरपूर प्रतिनिधी - 



शिरपूर तालुक्यात आता शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्यांसाठी आणि सत्यासाठी आवाज उचलणे हा गुन्हा झाला असून, असा प्रयत्न केल्यास कोणाचाही गंभीर परिणाम भोगावे लागतील जणू असा इशाराच राज्यकर्त्यांनी दिला असून शिरपूर मध्ये हुकूमशाहीच्या साम्राज्य वाढत आहे याचीच ही प्रचिती आहे असे आरोप आता खुलेपणाने होत आहेत.


शिरपूर तालुक्यात सुरू असलेल्या राजकीय हुकूमशाहीने आता आपले खरे अंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. राजकीय स्वार्थ आणि अट्टहासापोटी शिरपूर तालुक्यात जे काही घडतंय, ते केवळ एका कुटुंबावरचा अन्याय नाही — तर लोकशाहीच्या गळ्याभोवती घट्ट आवळली जाणारी सत्तेची साखळी आहे.


शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणं, जनतेसाठी आंदोलन करणं, अन्यायाविरुद्ध बोलणं — हे आता गुन्हा ठरलं आहे का? असा खुला प्रश्न शेतकरी विकास फाउंडेशन यांनी मांडला आहे. या तालुक्यात “सत्ता”ला प्रश्न विचारलात तर “शिक्षा” — हीच नवीन प्रशासन शैली झाली आहे का? ही तर अघोषित राजकीय हुकूमशाही झाले अशी  टीका देखील त्यांनी केले आहे.


या तालुक्यात अन्याय विरुद्ध उभे राहण्याची आणि सामान्यांच्या आवाज म्हणून पुढे येण्याची तयारी शिरपूर फर्स्ट च्या माध्यमातून हंसराज चौधरी या युवकाने दाखवली. हेच काम शेतकरी विकास फाउंडेशन मागील अनेक वर्षांपासून करत आहे. 

शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी शेतकरी विकास फाउंडेशनने अनेक महत्त्वपूर्ण आंदोलने करून या तालुक्यात जागृती निर्माण करण्याचे काम केले आहे.


“शिरपूर फर्स्ट”च्या माध्यमातून गेल्या काही वर्षांत हंसराज चौधरी यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांचे, मजुरांचे, आणि आदिवासी बांधवांचे प्रश्न ठामपणे मांडले. टोलमाफी, अतिवृष्टी, शेतकरी आत्महत्या, कारखान्यांचे थकलेले पैसे — या प्रत्येक प्रश्नावर त्यांनी शिस्तबद्ध आंदोलनं केली.


त्यांचा एकच हेतू — “शेतकऱ्याला न्याय मिळावा.”

पण या आवाजामुळे काहींच्या सिंहासनाखालील पाया हलू लागला, राजकीय स्वार्थ आणि व्यवसायिक गणिते धोक्यात आल्याच्या साक्षात्कार झाला, या तालुक्यात कोणीही युवा नेतृत्व तयार होऊ नये अशी मानसिकता असलेल्या लोकांनी आता नेतृत्व संपवण्याच्या प्रयत्न करण्यासाठी त्याचा बदला त्यांच्या वडिलांच्या निलंबनातून घेण्यात आला! हा फक्त अन्याय नाही —  तर ही लोकशाहीची गळचेपी आहे.


शिक्षक असलेल्या वडिलांवर कारवाई करणं म्हणजे केवळ कुटुंबावर वार नाही, तर विचारांवर प्रहार आहे.

या घटनेतून स्पष्ट होतं की शिरपूर तालुक्यात सत्ताधाऱ्यांनी “भिन्न मत” आणि “प्रश्न विचारणे” यांना गुन्हा ठरवलं आहे.भोंदू आणि दुटप्पी राजकारण करणारे काही नेते — ज्यांची निष्ठा ना पक्षाशी, ना जनतेशी — तेच या परिस्थितीचे जनक आहेत.


त्यांच्या मते या तालुक्यात कोणीही टोलबाबत, सहकारी संस्थांबाबत, कारखाना बाबत, भ्रष्टाचाराबाबत, या तालुक्यातील हुकूमशाही बाबत, कोणीही काही बोलू नये, अन्यथा लाथ सरळ तुमच्या पोटावरच बसेल असा हा इशारा आहे.


खरे तर स्वतःला कार्यसम्राट समजणारे हे लोक आज भाजपमध्ये आहेत, उद्या कुणाच्या तरी मांडीवर बसतील, पण जनतेच्या पाठीशी उभं राहण्याचं धैर्य नाही.अशा लोकांनी सत्तेला गुलाम बनवलं आहे, आणि शिरपूरच्या लोकशाहीचा गळा आवळला आहे.


हंसराज चौधरी यांचा एकच “गुन्हा” — त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला विचारलं, “शिरपूरला अतिवृष्टीग्रस्त तालुक्याचा दर्जा का दिला नाही?”


या तालुक्यातील नागरिकांना टोल माफी का नाही? तालुक्यातील आदिवासी बांधवांना मूलभूत सुविधा का नाही ? रोड कंपन्यांनी भ्रष्टाचार माजवला असताना त्यांच्यावर नियंत्रण का नाही ? हे विचारणं म्हणजे सत्तेला आरसा दाखवणं. आणि सत्तेला आरसा दाखवला की ती आरसाच फोडते — नेमकं तेच झालं!

शेतकरी एल्गार मोर्चात सहभागी झालेल्यांनाही निलंबनाचा फटका बसला — ही काय लोकशाही आहे की लोकभीतीचं राजकारण? संपूर्ण तालुक्याची राजसत्ता तुमच्या ताब्यात असताना प्रशासन तुमच्या खिशात असताना, एका तरुणाच्या आंदोलनाची एवढी भीती, ही तर तुमच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे.


आज शिरपूर तालुक्यात हळूहळू “लोकशाही” हरवून “राजेशाही” रुजते आहे.नेते लोकप्रतिनिधी म्हणून नाही, तर मालक म्हणून वागत आहेत.

प्रश्न विचारणारे “शत्रू”, आणि गप्प बसणारे “आपले माणसं” — हा नवा न्यायाचा मापदंड झाला आहे.

ज्यांनी जनतेसाठी उभं राहिलं, त्यांचा नाश — आणि ज्यांनी सत्तेसाठी गुडघे टेकले, त्यांची उन्नती!


आज हंसराज चौधरी आणि त्यांच्या कुटुंबावर जे घडलं, ते उद्या तुमच्यावरही होऊ शकतं.

जर आपण आज मौन बाळगलं, तर उद्या अन्याय आपल्या दारात उभा राहील.

हा प्रश्न केवळ चौधरी कुटुंबाचा नाही — हा प्रश्न आहे “शिरपूरमधील लोकशाहीचा आत्मा वाचवण्याचा.”


 शेतकरी विकास फाउंडेशन ने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. कारण जेव्हा शिक्षकावर सूडभावनेतून कारवाई होते, तेव्हा समाजाचं भविष्यच धोक्यात येतं.

शिरपूर तालुका हा अन्यायाचा नाही, न्यायाचा आणि शौर्याचा वारसा असलेला आहे — तो गप्प बसणार नाही!

आज चौधरी परिवाराच्या घरावर अंधार आहे, पण त्या अंधारातूनच नव्या पहाटेचा प्रकाश फूटणार आहे.

कारण आवाज दाबला जाऊ शकतो, पण सत्य कधीच संपवता येत नाही. "शेतकऱ्यांच्या न्यायासाठी उभं राहणं हा गुन्हा नाही — तो माणुसकीचा धर्म आहे!"


त्यामुळे शेतकरी विकास फाउंडेशन हे समर्थपणे या तालुक्यात आंदोलनाच्या लढा देणाऱ्यांच्या सोबत आहे. त्यांच्यासाठी रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढा लढण्यासाठी देखील सज्ज आहे. 


या संपूर्ण घटनेचा शेतकरी विकास फाउंडेशन जाहीर निषेध व्यक्त करत असून, या हुकूमशाही प्रवृत्तीचा देखील धिक्कार करत आहे. आगामी काळात तालुक्यात निवडणुका आहेत, आणि याच मुद्द्यावरून संतप्त झालेल्या जन भावना आपल्याला राजकीय आरसा दाखवतील. ही नवीन तरुणाई आहे, आज तुम्ही एका हंसराज च्या आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला तर उद्या असे घराघरातून हंसराज पुढे येतील. लक्षात असू द्या आता सामना तरुणाईशि आहे. हेच तरुण आगामी काळात तालुक्यात क्रांतिकारक बदल करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करतील. अशा सर्व तरुणांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे असून आणि तरुणांवरील या अन्यायाच्या तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो .असे  प्रसिद्धी पत्रक ॲड.गोपालसिंग राजपुत व मोहन साहेबराव पाटील ,शेतकरी विकास फाउंडेशन शिरपुर यांचे वतीने प्रसिध्दीस देण्यात आले आहे.





Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने