🌾 होळनांथे मंडळातील शेतकऱ्यांना फळ पीक विमा अनुदानात तफावत; अनुभव युवा मंच यांच्या माध्यमातून निवेदन
शिरपूर (प्रतिनिधी) –
शिरपूर तालुक्यातील होळनांथे महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 2024 मधील फळ पीक विमा अनुदानात अन्य मंडळांच्या तुलनेत कमी रक्कम मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या संदर्भात आज अनुभव युवा मंच माध्यमातून तालुका कृषी अधिकारी श्री. संजय पवार यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, शिरपूर तालुक्यातील इतर दहा महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना सरासरी ₹75,000 इतके अनुदान मिळाले असताना, होळनांथे मंडळातील शेतकऱ्यांना फक्त ₹42,500 इतकेच अनुदान मंजूर झाले आहे. या तफावतीबाबत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करून न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.
निवेदन देताना जितेंद्र राठोड, राहुल बंजारा, दीपक बंजारा, जयेश बागुल आणि सोमनाथ मराठे उपस्थित होते. त्यांनी संबंधित विमा कंपनी आणि ट्रिगर मशीन ऑपरेटर यांच्या भूमिकेबाबत चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, फळ नुकसानीच्या प्रमाणानुसार होळनांथे मंडळातील नुकसान अधिक असूनही अनुदान कमी देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कृषी अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारत तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
अन्यथा शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर संविधानिक मार्गाने आंदोलन उभारण्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.
