शिरपूर वरवाडे नगर परिषद निवडणूक विशेष..
शिरपूरात "हुकूमशाहीचे मुखवटे फाटणार, लोकशाहीचा आवाज बुलंद होणार ?
राजकारण - महेंद्रसिंह राजपूत
शिरपूर तालुक्यात सध्या एक विचित्र आणि धोकादायक राजकीय चित्र उभे राहत आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकांचे दरवाजे खुले झालेत, आता तर निवडणुकांची घोषणा देखील झाली.
जवळपास मागील साडेचार वर्ष निवडणुका न झाल्याने उत्सुक उमेदवारांमध्ये निवडणुकीची प्रतीक्षा होती. यावेळेस दोन प्रभाग जरी वाढले असले तरी इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे. मात्र ज्यांना सत्ताधारी पक्षाचे तिकीट मिळणार नाही , ते विरोधी पक्षाची किंवा अपक्षाची ,किंवा मित्र पक्षाची वाट धरतील का ? हा देखील प्रश्न आहे.
अनेक इच्छुकांनी खऱ्या लोकशाही पद्धतीने आपली ताकद आजमावण्याचे स्वप्न पाहिले आहे. पण या स्वप्नावर काही स्वघोषित , राजकीय पंडित यांनी आपणच सर्वशक्तिमान आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्या नेत्यांचे मनसुबे जाहीर करण्यास सुरूवात केली आहे.
"एकतर्फी निवडणुका होणार", "कोणताही विरोध उरलेला नाही", "नेते जे सांगतील त्यालाच उमेदवारी मिळेल", तालुक्यात विरोधक शिल्लक नाहीत, विरोधी पक्षांच्या कोणतेही अस्तित्व नाही अशी विधानं करत काहींचा अति आत्मविश्वास आता लोकशाहीला नाकारण्यापर्यंत पोहोचला होता. इतकेच काय तर पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना देखील डावण्याच्या डाव सुरू होता. ज्याला सत्ताधारी पक्षाचे तिकीट मिळेल तोच विजयी असे देखील धारणा लोकांमध्ये पसरवली जात होती.
ही प्रवृत्ती केवळ राजकीय हेकटपणाच नव्हे, तर संविधानाच्या तत्त्वांवर केलेला प्रहार आहे.
तालुक्याचे राजकारण एव्हढ्या खालच्या पातळीवर नेले जात आहे की सत्ताधाऱ्यांची निष्ठा दाखवणाऱ्या निवडक लोकांना सन्मान मिळतो, सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यांची सर्वाधिक अब्रू विकली गेली अशा लोकांसाठी राजकीय पदे आरक्षित केले जातात.
तर विचार, कर्तृत्व, समाजकार्य याची थट्टा केली जाते. युवाप्रतिनिधित्व टाळले जाते,जे ‘हो’ म्हणतील त्यांनाच संधी, आणि जे प्रश्न विचारतील त्यांना मार्गातून बाजूला करण्याचे हे षडयंत्र स्पष्ट जाणवत होते. ही केवळ व्यक्तिवादी हुकूमशाही नाही, तर लोकशाहीची गळचेपी करणारी रचना ठरत होती.
एकतर्फी निवडणुकांचे स्वप्न पाहणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे – संविधान अजून जिवंत आहे, आणि शेवटचा शब्द जनतेचा असतो. जनता हे पाहते, समजते आणि वेळ आली की उत्तरही देते. सत्तेचा गुरूर फार काळ टिकत नाही, कारण कोणत्याही सत्ताधाऱ्याचा "अवधीत मुक्काम" हा नशिबाने नाही, तर जनतेच्या आशीर्वादाने असतो. आणि जेव्हा जनता उठते, तेव्हा सिंहासन उध्वस्त व्हायला वेळ लागत नाही.
विरोधकांना खच्चीकरण करून, अपक्षांना गप्प करून आणि सामान्य कार्यकर्त्यांची उमेदवारी धुळीला मिळवून जो लोकशाहीचा अवमान केला जात आहे, त्याला जोरदार उत्तर देण्याची गरज निर्माण झाली होती. ही निवडणूक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या नियमानुसार व्हायला हवी, कोणत्याही स्थानिक "नेत्याच्या" इच्छेनुसार नाही. अशी सुप्त इच्छा कार्यकर्त्यांच्या मनात होते.
त्यामुळे यापुढे शिरपूर तालुक्यातील जनतेने डोळसपणे, निर्भयपणे आणि ठामपणे मतदान करून हे दाखवून द्यावे की ‘हुकूमशाही’ ही केवळ भिती पसरवणाऱ्यांची पोकळ कल्पना आहे. खऱ्या अर्थाने लोकशाही म्हणजे मत, विचार, आणि मतदाराचे स्वातंत्र्य. आणि हे स्वातंत्र्य कुणाच्या आज्ञेवर चालत नाही. आणि हो "एकतर्फी निवडणुकांचे गाजर दाखवणाऱ्यांनो, आठवा – हा देश बाबासाहेबांच्या संविधानावर चालतो, तुमच्या मनमानीवर नव्हे!"
एकीकडे अनेकांना एकतर्फी निवडणुकीचे डोहाळे लागले असताना, शिरपूरच्या राजकारणात अचानक एक मोठा भूकंप झाला, नगर परिषदेच्या संपूर्ण जागा सहित नगराध्यक्षपद लढवण्याची मोठी तयारी सुरू झाली , आणि सत्ताधारी पक्षातील काही नाराज, आणि आजी माझी पदाधिकारी यांनी मिळून एक मोठा क्रांतिकारक निर्णय घेतला आणि थेट भाजपला सोडचिठ्ठी देत शिंदे गटातील शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करून ही निवडणूक लढवण्याची रणनीती तयार करत, एक नवी राजकीय आव्हान समोर उभे केले. त्याला मी तर पक्षाने अपक्षांचे देखील बळ मिळण्याची शक्यता आहे.
त्यामुळे परिस्थितीनुसार अनेक राजकीय रणनीती बदल होणारा असून, सत्ताधारी पक्षाकडून अनेकांना मिळालेले तिकिटाचे आश्वासन यात देखील बदल होऊ शकतो, इतकेच काय तर नगराध्यक्ष पदासाठी देखील नवीन रणनीती तयार करावी लागणार आहे, त्यामुळे वरवर एकतर्फी वाटणारी शिरपूर नगर परिषदेची निवडणूक अचानक पणे रंगात येत असून, प्रत्येक वार्डात विरोधाचा कडवा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. शिवाय नगराध्यक्ष पदासाठी देखील फार मोठी चुरस निर्माण झाली असून या पदासाठी देखील मोठे आव्हान उभे करण्यात आले आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांपुढे दुहेरी संकट उभे राहिले असून इच्छुकांची गर्दी, तिकीट नाकारल्यानंतर नाराजांचा आक्रोश, आणि विरोधकांचे आव्हान असा तीहेरी सामना करावा लागणार आहे.
त्यामुळे नगरपरिषदेची निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आता दिसत आहेत. त्यात येणाऱ्या काही दिवसात होणाऱ्या शहरात अनेक राजकीय घडामोडी,
घडण्याची चिन्ह दिसत असून, वरवर एकतर्फी वाटणारी नगरपरिषद निवडणूक चांगलीच रंगात आली असून ती चुरशीची होण्याकडे वाटचाल होत आहे.
त्यामुळे एकीकडे अनुभवी आणि धूर्त राजकारण तर दुसरीकडे तरुणांच्या नवा युवा जोश असा राजकीय संघर्ष उभा राहिला असून काही दिवसांपूर्वी एकतर्फी वाटणारी शिरपूर वरवाडे नगरपरिषदेची निवडणूक अनेक राजकीय घडामोडींमुळे अचानकपणे चुरशीची प्रतिष्ठेची, आणि संघर्षाची होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. त्यामुळे आगामी काळात हा संघर्ष तालुक्यातील हुकूमशाहीचे मुखवटे फाडणार का ? या तालुक्यात पुन्हा एकदा लोकशाहीचा आवाज बुलंद होणार का ? की पुन्हा लोक सत्ताधारी लोकांचे हात बळकट करतील याकडे फक्त शिरपूर शहराचे नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
