लेख :२७ सप्टेंबर- जागतिक पर्यटन दिन* *महाराष्ट्र हे पर्यटनाचं नंदनवन* ✍️लेखक - रणवीर राजपूत, ठाणे/नंदुरबार* *गवर्नमेंट मिडिया,महाराष्ट्र शासन*

 


*लेख :२७ सप्टेंबर- जागतिक पर्यटन दिन*


*महाराष्ट्र हे पर्यटनाचं नंदनवन*


✍️लेखक - रणवीर राजपूत, ठाणे/नंदुरबार*

*गवर्नमेंट मिडिया,महाराष्ट्र शासन*


महाराष्ट्र हे पर्यटनाचं नंदनवन आहे.वास्तवात महा..राष्ट्र हे चांद्यापासून बांध्यापर्यंत निसर्गसौंदर्याने नटलेला आहे.यास्तव जगाची सफर करण्याची इच्छा असणाऱ्या पर्यटकांनी सर्वप्रथम महाराष्ट्राची सफर करून पहावी,म्हणजे पर्यटनाची तहान भागल्याशिवाय राहणार नाही.


जागतिक पर्यटनातून देशा- देशातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ व्हावेत अन् त्यांच्यात सांस्कृतिक देवाणघेवाण व्हावी,या उद्देशाने युनोच्या जागतिक पर्यटन संघटनेने १९८० साली *२७ सप्टेंबर* हा दिवस *जागतिक पर्यटन दिन* म्हणून साजरा करण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला.या संघटनेने जगातल्या पर्यटकांसाठी काही स्थायी नियम लागू केले असून,त्यांचे कर्तव्यबुद्धीने तंतोतंत पालन करावे,हे अपेक्षित आहे.याशिवाय देशांतर्गत पर्यटकांनी सांस्कृतिक,सामाजिक व नैतिक मूल्ये जपून पर्यटनाची मजा लुटावी,असे आवाहन करण्यात येते.महत्वाचे म्हणजे *पर्यटक* हा *ग्राहक राजा* असल्याने शासकीय अन् खाजगी पर्यटन उद्योग संस्थांनी त्याचं हित जपणं अगत्याचे आहे.


मराठी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला रायगड,शिवनेरी,विजयदुर्ग,

कर्नाळा,दुर्गाडी,जंजिरा,

रत्नदुर्ग,सुवर्णगड,पन्हाळा,

तोरणा,पुरंदर,प्रतापगड आदी गडकिल्यांचा गौरवशाली इतिहास लाभला आहे.अन् हीच खरी महाराष्ट्राची अस्मिता असून,तिचे जतन व संवर्धन केंद्र अन् राज्य सरकारने लोकसहभागातून केलं पाहिजे.याबाबतीत मात्र कुठलीही तडजोड नसावी.कारण हा आमचा समृद्ध ठेवा आहे.


*सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे देशातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळ असलेले शहर म्हणून "सिंधूदुर्ग" जिल्ह्याला मान मिळाला आहे*.*इतकेच नव्हे तर,कोंड नेस्ट ट्रॅव्हलर मॅगझिनने केलेल्या* 

*सर्व्हनुसार जगातील ३० सुंदर पर्यटन स्थळांमध्ये भारतातल्या "सिंधूदुर्ग" जिल्ह्याचा समावेश करण्यात आला,हे भारतीयांसाठी गौरवास्पद गोष्ट आहे.*


जगाला अचंबित करणारा आविष्कार असलेल्या वैश्विक कीर्तीच्या *अजंठा-वेरूळ लेणी* व एलिफंटा लेणी म्हणजे महाराष्ट्राला लाभलेलं सांस्कृतिक वैभव आहे.दुसरीकडे संह्याद्री,सातपुडा,बालाघाट अशा पर्वतरांगांनी वेढलेला हा प्रदेश असून,लांबच लांब

समुद्रकिनाऱ्याने आच्छादलेली कोकण 

सागरीपट्टी महाराष्ट्राला लाभली आहे.मुंबई,रायगड,रत्नागिरी, सिंधूदुर्ग येथील अथांग समुद्र पर्यटकांना मोहिनी घालणारा आहे.त्यामुळे देश- परदेशातील पर्यटक येथे पर्यटनाची मजा लुटण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात.त्यामुळे शिवरायांच्या महाराष्ट्राचे नाव आख्या जगात अजरामर होते,याचा महाराष्ट्रीय माणसाला सार्थ अभिमान आहे.


महाराष्ट्राला महाबळेश्वर,लोणावळा,

खंडाळा,माथेरान,तोरणमाळ

(जि.नंदुरबार)सारखी निसर्गरम्य थंडहवेची(हिल स्टेशन)ठिकाणे लाभलेली आहेत.त्याचप्रमाणे *लोणारचे अदभुत सरोवर*, गेट वे ऑफ इंडिया,तारापोरवाला मत्स्यालय,राणीचा बाग,हँगिंग गार्डन,गिरगाव चौपाटी,जुहू बिच,नेहरू तारांगण,बीवी का मकबरा,पवनचक्की

आदी प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांना भुरळ घालतात.संजय गांधी राष्ट्रीय उद्यान,राष्ट्रीय ताडोबा अभयारण्य,कर्नाळा,मेळघाट,भामरागड,पैनगंगा,नागझिरा,माळढोक,पेंच येथील अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्प ही सर्व निसर्गाने राज्याला बहाल केलेली मोठी देणगी आहे.नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध असे ठोसेघर,माळशेज घाट,आंबोली,मुळशी येथील नयनमनोहर धबधबे पाहून पर्यटक अक्षरश: पाण्यात नृत्य करून आपले भान विसरत असतात.वास्तवात महाराष्ट्राची हीच खरी नैसर्गिक संपत्ती आहे,जेथे देश-परदेशातील पर्यटक आनंद लुटण्यासाठी येत असतात.


महाराष्ट्र ही थोर संतांची भूमी आहे.त्या पार्श्वभूमीवर येथील काही धार्मिक स्थळांना राज्य शासनाने पर्यटन स्थळांच्या धर्तीवर विकसित केलं आहे.त्यात प्रामुख्याने शिर्डीचे साईबाबा,पंढरपूर, त्रंबकेश्वर,वणीचे सप्तशृंगी देवस्थान,नाशिकचे मुक्तिधाम,अंबरनाथचे शिव देवस्थान,दक्षिण काशी म्हणून गणलेले प्रकाशा (जि.नंदुरबार)यांचा समावेश आहे.याशिवाय चैत्यभूमी,दीक्षाभूमी,ड्रॅगन पॅलेस या जगप्रसिद्ध स्थळांना बौद्धधर्मियांसह देश-परदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने भेटी देऊन नतमस्तक होत असतात.ही सर्व स्थळे पाहिल्यावर, महाराष्ट्र हे पर्यटनाच्या दृष्टीने देशातील अग्रेसर राज्य आहे,हे सिद्ध होते.


राज्य सरकारचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ हे देशी व विदेशी पर्यटकांना 

पंचतारांकित सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव बांधिल आहे.त्याचा टोल फ्री नंबर १८०००१११३६३ हा,तर फोन नंबर ०२२-२२८४५६७८ यावर अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.सदर महामंडळाची वेबसाईट 

maharashtratourism. gov.in ही आहे.


देशांतर्गत पर्यटकांनी सांस्कृतिक,सामाजिक व नैतिक मूल्ये जपून पर्यटनाचा आनंद लुटावा.पर्यटकांना विनंती आहे की,ऐतिहासिक स्थळांना भेटी देतेवेळी तेथील वास्तूंवर आपली नावे कोरून वा अभद्र चित्रे काढून त्यांचे विद्रुपीकरण(defacement) करू नये.तसेच या स्थळांचे पावित्र्य(sanctity) कायमस्वरूपी टिकून रहावे,यासाठी पाण्याच्या- मद्याच्या रिकाम्या बाटल्या इतस्ततः फेकू नका.अशा पवित्र व सुंदर स्थळी

मद्यपान करण्याचे दुष्कृत्य करू नका.हे असभ्यतेचे लक्षण आहे.भारतीय संस्कृतीत पर्यटकांना उद्देशून *अतिथी देवो भव:* असे आदराने म्हटले जाते,याचे सर्वांनी भान ठेऊन आपल्या देशात-राज्यात येणाऱ्या विदेशी पर्यटकांना सन्मानाची वागणूक द्यावी,जेणेकरून आपले द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील.सांगण्याचे तात्पर्य म्हणजे आपल्या देशाची प्रतिमा उंचविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रयत्न करावेत,म्हणजे जागतिक पर्यटन दिन साजरा करणे खऱ्या अर्थाने सार्थक ठरेल.

जय🇮🇳हिंद!जय🚩 महाराष्ट्र!



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने