शहरापासून हाकेच्या अंतरावर पिंपरी गावचे रस्ते खड्ड्यांच्या खाईत; शेतकरी अडचणीत, लोकप्रतिनिधी निधीअभावी हात झटकतात!”

 


शहरापासून हाकेच्या अंतरावर पिंपरी गावचे रस्ते खड्ड्यांच्या खाईत; शेतकरी अडचणीत, लोकप्रतिनिधी निधीअभावी हात झटकतात!”


शिरपूर (प्रतिनिधी):



शिरपूर तालुक्यातील अति दुर्लक्षित आणि खड्डे युक्त झालेला हा रस्ता तालुक्यातील अतिदुर्गम भागातील नाही तर शहरापासून काही अंतरावर असलेल्या पिंपरी गावाच्या आहे.


राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ पासून अवघ्या काही किलोमीटरवर असलेल्या पिंपरी गावाचा रस्ता गेल्या तीन वर्षांपासून अक्षरशः खड्ड्यांच्या खाईत बदलला आहे. महामार्गावरील टोल चुकवण्यासाठी या रस्त्यावर दिवस-रात्र शेकडो अवजड वाहने धावत असतात. परिणामी रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, डांबराचा अंशसुद्धा उरलेला नाही. हातभर खोल खड्डे, सात-आठ फुटांचे पाण्याने भरलेले खच, चिखल व रुतलेली वाहने… हे चित्र ग्रामीण भागाचे नव्हे, तर शहरापासून जवळच्या गावाचे आहे, ही बाब धक्कादायकच!


यामुळे मात्र आता गावकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे. अपघात, टायर फुटणे, कार व ट्रक चिखलात रुतणे, क्रेनसाठी १०-१२ हजार रुपये मोजणे… हे नित्याचे झाले आहे. कृषीमाल वाहतूक करणाऱ्या वाहनांची परिस्थिती अधिकच बिकट आहे. आधीच अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेला शेतकरी, आता रस्त्यामुळे तिप्पट खर्च करूनही आपला माल बाजारात पोहोचवू शकत नाही. व्यापारी थेट शेतात येण्यास टाळाटाळ करतात, त्यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टरवरून माल महामार्गापर्यंत नेऊन व्यापाऱ्याच्या वाहनात भरावा लागतो. यातून शेतकऱ्यांना मजुरी व वाहतुकीचा तिप्पट खर्च सोसावा लागतो, तर बाजारात मालाचे भाव पडतात.


ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऊसतोड मोसम सुरू होतो. मात्र पिंपरी शिवारातील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे मुकादमांनी यंदा ऊसतोड करण्यास सरळ नकार दिला आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांनी ऊस वेळेत कारखान्यात पोहोचावा म्हणून चालकांना सातशे-आठशे रुपये बक्षीस, पार्टी देऊन गोड बोलवले होते. पण यावर्षी परिस्थिती इतकी वाईट आहे की, उसाचे पीक शेतातून बाहेर निघेल का, याबाबत शेतकरी धास्तावले आहेत. ऊसच नव्हे, तर केळी, पपई, कापूस यासारख्या नगदी पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.


गावकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आमदार अमरीश पटेल व आमदार काशीराम पावरा यांची वारंवार भेट घेऊन रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्याची मागणी केली. मात्र निधीअभावी काम होऊ शकत नाही, डिसेंबर अखेरपर्यंत निधी मिळाल्यास दुरुस्ती होईल, असे सांगून पदाधिकाऱ्यांनी हात झटकले.

गावकऱ्यांचा सवाल आहे की, “भरघोस मते देऊनही आमच्या मूलभूत समस्यांकडे लोकप्रतिनिधी व प्रशासन इतके उदासीन का? 

रस्त्यांच्या समस्येकडे वारंवार ग्रामपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. आता ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे की, “तातडीने डागडुगी, खडीकरण अथवा कॉंक्रिटीकरण करून कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल.”


पिंपरीच्या रस्त्यांवरील खड्डे केवळ वाहतुकीला नाही, तर शेतकऱ्यांच्या उपजीविकेला अडथळा ठरत आहेत. विकासाच्या नावाने मोठे दावे करणारे लोकप्रतिनिधी व अधिकारी, गावकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे कानाडोळा करून बेफिकिरीची परंपरा जोपासत आहेत, ही बाब संतापजनक आहे. त्यामुळे हक्काची वोट बँक असलेले हे गाव सध्या मात्र खड्ड्यांच्या विडख्यात अडकले आहे.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने