मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत बोरडी येथे महिला बचतगट सक्षमीकरण व लखपती दिदींना मार्गदर्शन
बोराडी (प्रतिनिधी):
ग्रामपंचायत बोराडी (ता. शिरपूर, जि. धुळे) यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत विशेषतहा बोरडी ग्रामपंचायत मधील महिला सदस्यांनी महिला बचतगट सक्षमीकरण व कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. भगवान बिरसामुंडा आदिवासी सांस्कृतिक भवन येथे सोमवारी दि२९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या शिबिराला गावातील महिला बचतगटांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिराच्या आयोजनाचा उद्देश ग्रामविकासात महिलांचा सक्रीय सहभाग घडवून आणणे, गावातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, महिलांना स्वावलंबन व आत्मनिर्भरतेकडे नेणे आणि ग्रामपंचायत आत्मनिर्भर बनविण्यासाठी मजबूत पायाभरणी करणे हा होता.
गावातील ३१महिला बचतगटांनी सुमारे ३०० महिलांनी या शिबिरात सहभाग घेतला. बचतगटांमुळे महिलांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास आणि समाजातील त्यांच्या योगदानाची जाणीव या शिबिराच्या माध्यमातून अधिक दृढ झाली. महिलांनी एकत्रितपणे बचत, छोटे व्यवसाय आणि सामूहिक उपक्रम राबवून घरगुती उत्पन्न वाढविण्याचे उदाहरण मांडले.
कार्यक्रमात लखपती दीदी योजना आणि कर्जवाटप या विषयांवर ग्रामपंचायत सदस्या सौ. विद्या रंधे यांनी विशेष मार्गदर्शन केले. आपल्या सविस्तर भाषणात त्यांनी महिलांना बचतगटाच्या माध्यमातून आर्थिक प्रगती कशी साधता येते याचे उदाहरणांसह विवेचन केले. त्यांनी सांगितले की, केवळ बचतीपुरता मर्यादित न राहता महिलांनी उद्योग-व्यवसाय सुरू करून घरगुती उत्पन्न वाढवावे. शासनाकडून मिळणाऱ्या विविध कर्ज योजनांचा योग्य वापर करून महिलांनी शेतीपूरक व्यवसाय, पशुपालन, कुक्कुटपालन, खाद्यप्रक्रिया उद्योग, शिवणकाम, ब्यूटीपार्लर आदी क्षेत्रांत संधी शोधावी.
“आजचा बचतगट हा उद्याचा उद्योग आहे” असे प्रतिपादन करत त्यांनी महिलांना उद्योगशीलता व आत्मनिर्भरतेच्या मार्गावर चालण्याचे आवाहन केले. तसेच लखपती दीदी संकल्पना महिलांना प्रेरणा देणारी असून, त्याद्वारे लाखो रुपयांचा वार्षिक उलाढाल साधणाऱ्या महिला तयार होत आहेत, हे त्यांनी अधोरेखित केले.
या शिबिरातून महिलानाही रोजगार निर्मितीबाबत नवी दिशा मिळाली. शेतीपूरक उद्योग, आधुनिक शेती तंत्रज्ञान, लघुउद्योग सुरू करण्याबाबत युवकांना मार्गदर्शन करण्यात आले. यामुळे गावातील बेरोजगार युवकांना स्वावलंबनाचा मार्ग खुला होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या शिबिरास धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजीज शेख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा नोडल अधिकारी स्वरांजली पिंगळे, आमदार काशिराम पावरा, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, गटविकास अधिकारी प्रदीप पवार व विस्तार अधिकारी संजय पवार यांचे मार्गदर्शन लाभले. मान्यवरांनी महिलांना शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली तसेच या योजनांचा लाभ घेऊन गावाला आत्मनिर्भर बनविण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे आयोजय ग्रामपंचायत बोराडीचे सरपंच सुखदेव भिल, उपसरपंच राहुल रंधे, तसेच ग्रामपंचायत सदस्य विद्या रंधे, उर्मिला पावरा, नीता पवारा, सोनाली सत्तेसा, चांदारीबाई पावरा, आरती भिल, अनिता बडगुजर, मयुरी पवार, शारदा भिल, अनिल पावरा, चंद्रसिंग पवार, बबन पाटील, हारसिंग पावरा, भीमसिंग कुवर, निलेश महाजन, सतीश पवार, ललिता माळी, मिना भामरे, सविता पावरा, यांच्यासह आदींनी नियोजन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र साळुंखे, चंद्रकांत राजपूत, आंबादास सगरे, गणेश भामरे, अनिल शिरसाठ, गजू पाटील, चंद्रकांत बडगुजर, भूषण कुलकर्णी, मुकेश जाधव, उमेश पावरा, बादल पावरा, विजय पावरा, आकाशा पावरा आदींनी विशेष परिश्रम घेतले.
या कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिरामुळे गावात लघुउद्योग सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महिलांना आत्मविश्वासाने स्वतःचे व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळाली असून, युवकांनाही नवीन दृष्टी मिळाली आहे. यामुळे गावाचे आर्थिक स्थैर्य वाढेल, ग्रामविकासाची गती तीव्र होईल आणि ग्रामपंचायत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करेल.
ग्रामपंचायत बोराडीने राबविलेला हा उपक्रम इतर ग्रामपंचायतींसाठी आदर्श ठरणार असून, बोराडी ग्रामपंचायत मधील प्रत्येक्ष महिला “लखपती दीदी” होण्याच्या दिशेने पुढे सरसावत आहे.