रोटरी इंग्लिश स्कूलमध्ये गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी; विद्यार्थ्यांनी दिलं गुरूंना गुलाबपुष्पांचं गुरुदक्षिणा-वंदन
दोंडाईचा (प्रतिनिधी – अख्तर शाह)
दोंडाईचा येथील श्रीमती मंदाकिनी टोणगावकर रोटरी इंग्लिश स्कूलमध्ये अध्यात्म, संस्कृती व परंपरेचा सन्मान राखत गुरुपौर्णिमा सोहळा अत्यंत भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. महाभारत, वेद आणि पुराणांचे रचनाकार आद्यगुरु महर्षी व्यास यांना वंदन करून या गुरुपूजनाचा शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री. श्रुतिरंजन बारिक हे होते, तर शालेय समन्वयक श्री. प्रशांत जाधव आणि सर्व शिक्षकगण यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व गुरुश्लोकांनी करण्यात आली. शाळेच्या विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाने गुरुजनांना गुलाबपुष्प अर्पण करून वंदन केले. या शालेय गुरुदक्षिणेच्या अनोख्या क्षणी सर्व वातावरण भक्तिभावाने भारले गेले.
विद्यार्थ्यांनी गुरुश्लोकावर आधारित नृत्य सादरीकरण करून गुरूंप्रती आदरभाव व्यक्त केला. या प्रसंगी वृषभ बच्छाव या विद्यार्थ्याने आपल्या भाषणातून भारताची गुरू-शिष्य परंपरा आणि महर्षी व्यासांचे कार्य प्रभावीपणे उलगडून दाखवत गुरुपौर्णिमेचे पवित्र महत्त्व सांगितले. ‘‘आपण ज्या व्यक्तींकडून शिक्षण घेतो, त्या गुरुजन, माता-पिता आणि मार्गदर्शकांचं आज स्मरण करून त्यांच्या ज्ञानरूपी देणगीला वंदन करणे हीच खरी गुरुदक्षिणा आहे,’’ असे त्याने ठामपणे सांगितले.
प्राचार्य श्री. श्रुतिरंजन बारिक यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ‘‘गुरु हे प्रत्येकाच्या जीवनात दिशादर्शक ताऱ्यासारखे असतात. गुरुंच्या मार्गदर्शनानेच आपण सद्वर्तन, आत्मिक शुद्धता आणि यशाच्या मार्गावर वाटचाल करू शकतो. त्यामुळे गुरु ही संकल्पना केवळ शाळेपुरती मर्यादित नसून ती संपूर्ण जीवनशैलीचा पाया आहे.’’
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. कार्तिकी लिंगायत व मनुश्री चौधरी यांनी उत्साहाने व नेटकेपणाने पार पाडले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये गुरूंबद्दलचा आदर, कृतज्ञता आणि मूल्यांची जाण निर्माण झाली. शाळेच्या अध्यापन संस्कृतीतूनच अध्यात्मिक संस्कारांची ही रोवणी पुढील पिढीत सातत्याने होत राहावी, हीच या उत्सवाची खरी फलश्रुती ठरली.