शिरपूर तालुक्यातील 118 ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच पदासाठी 03 जुलै 2025 रोजी आरक्षण सोडत
शिरपूर तालुक्यात एकुण 118 ग्रामपंचायती आहे. सदर ग्रामपंचायतींचे प्रवर्ग निहाय आरक्षण दि. 30/06/2025 रोजी काढणेत आले आहे. सदर ग्रामपंचायतीचे सन 2025-2030 या कालावधीसाठी अनुसूचित व बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीचे महिला सरपंच पदाचे आरक्षण यानुसार पेसा क्षेत्रातील 50 ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे अनुसूचित जमाती करिता आरक्षित करण्यात आले होते. पेसाव्यतिरिक्त असलेल्या 68 ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित जाती करिता 4 ग्रामपंचायती, अनुसूचित जमाती करिता 14 ग्रामपंचायती, नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता 19 ग्रामपंचायती तर उर्वरित 31 पदे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता आरक्षित करण्यात आली आहे.
तथापि,ग्रामविकास विभाग मंत्रालय, मुंबई, यांचेकडील दिनांक 13 जून 2025 रोजीच्या राजपत्रातील सुधारित निर्देशानुसार, यापूर्वी घेण्यात आलेली आरक्षण सोडत रद्द करून नव्याने आरक्षण सोडत घेणेबाबत सूचित करण्यात आले आहे.
त्यानुसार मा. जिल्हाधिकारी धुळे यांचेकडिल दि. 17 जून 2025 रोजीच्या आदेशानुसार, शिरपूर तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 118 ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच पदासाठी आरक्षण सोडत सभा मा. उपविभागीय अधिकारी सो., शिरपूर भाग यांचे अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय, शिरपूर येथे दि. 03/07/2025 रोजी सकाळी 11.30 वाजता निश्चित केले जाणार आहे. पेसाव्यतिरिक्त असलेल्या 68 ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित जाती करिता 4 ग्रामपंचायतींपैकी 02 सरपंच पदाचे महिला आरक्षण निश्चित करण्यात येणार आहेत., अनुसूचित जमाती करिता 14 ग्रामपंचायती ग्रामपंचायतींपैकी 07 सरपंच पदाचे महिला आरक्षण निश्चित करण्यात येणार आहेत, नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता 19 ग्रामपंचायती ग्रामपंचायतींपैकी 10 सरपंच पदाचे महिला आरक्षण निश्चित करण्यात येणार आहेत. तर उर्वरित 31 पदे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता 16 सरपंच पदाचे महिला आरक्षण निश्चित करण्यात येणार आहेत. सदर आरक्षण सोडत सभेसाठी तालुक्यातील सर्व आजी-माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, आजी-माजी सरपंच,उपसरपंच, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, तसेच विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व नागरिक यांनी उपस्थित राहणेबाबत याद्वारे आवाहन करण्यात येत आहे.