शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीचे तंत्र आत्मसात करावे – प्रदीप पवार
शिरपूर पंचायत समिती येथे कृषी दिन साजरा
शिरपूर प्रतिनिधी -
शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक शेती न करता आधुनिक शेतीचे विविध तंत्र आत्मसात करावे असे आवाहन शिरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री प्रदीप पवार यांनी आज येथे केले.
शिरपूर पंचायत समितीच्या सभागृहात मंगळवारी हरित क्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 1 जुलै रोजी कृषी दिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमास प्रगतिशील शेतकरी श्री सुदाम करंके , जिल्हा परिषदेचे समाज कल्याण समितीचे माजी सभापती श्री कैलास पावरा, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्री जयवंत पाडवी, माजी सभापती श्री सत्तारसिंग पावरा, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री आर के गायकवाड, तालुका कृषी अधिकारी श्री संजय पवार यांच्यासह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. याप्रसंगी तालुक्यातील प्रगतशील शेतकरी, कृषी सखी, महिला शेतकरी अशा एकूण 35 शेतकऱ्यांचा मानपत्र तसेच वृक्षाचे रोप देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना श्री पवार म्हणाले की, शेतीमध्ये देखील नवनवीन संकल्पना येत आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांनी केवळ पारंपारिक शेती न करता त्यासोबत आधुनिक तंत्र स्वीकारून त्याचा वापर करावा. त्या माध्यमातून शेतकरी समृद्ध होण्यास मदत मिळेल. बळीराजा उत्थान अभियान तालुक्यात प्रभावीपणे राबवावे. या अभियानांतर्गत शेतकऱ्यांची निवड करून त्यांना पैसा अंतर्गत तेलंगणा येथे शेती अभ्यास सहलीचे आयोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
तालुक्यातील प्रत्येक गटातून काही शेतकरी एकत्र येऊन मार्केटिंग तंत्र आत्मसात करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या.
प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले प्रगतीशील शेतकरी श्री सुदाम करंके यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शेतकऱ्यांनी पिकांच्या उत्पादनात वाढ कशी होईल या दृष्टीने देखील प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासोबत शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी विपणन तंत्रची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. शेतीला आधुनिकतेची जोड दिल्यास शेतकरी निश्चितच बळीराजा झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी श्री जयवंतराव पाडवी यांनी गट शेतीचे महत्व आणि फळबाग लागवड याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करून स्वतःचे अनुभव विशद केले.
तालुका कृषी अधिकारी श्री संजय पवार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती, फळबाग लागवड आणि नैसर्गिक शेतीचे महत्व समजावून सांगितले.
कृषी अधिकारी श्री राजेश चौधरी यांनी प्रास्ताविकात कै. वसंतराव नाईक यांचा जीवनपट मांडला. या कार्यक्रमास पंचायत समितीचे कृषी विभागाचे विस्तार अधिकारी श्री वाय. पी. गिरासे, श्री एन. टी. सोनवणे, मग्रारोहयोचे श्री गणेश पाटील, विकास वाघ, परवेज लाड यांच्यासह मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक यांच्यासह विविध शेतकरी बांधव उपस्थित होते. आभार प्रदर्शन कृषी अधिकारी श्री राजेश चौधरी यांनी
केले.