शिरपूर मार्केट कमेटीमध्ये शेतकऱ्यांचे शेड व्यापाऱ्यांच्या ताब्यात! पेमेंट विलंब, दादागिरी आणि शेतकऱ्यांचे हाल; कारभारावर गंभीर प्रश्न!"
✍️ प्रतिनिधी, शिरपूर:
शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारावर शेतकऱ्यांकडून पुन्हा एकदा गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. साईबाबा मंदिराजवळ शेतकऱ्यांसाठी बांधण्यात आलेले शेड व्यापाऱ्यांनी बेकायदेशीररित्या ताब्यात घेतले असून, शेतमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना उघड्यावर आपला माल मांडण्याची वेळ येत आहे. यामुळे केवळ शेतमालाचेच नाही तर शेतकऱ्यांच्या श्रम, वेळ आणि पैशाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. असा आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे.
2015 साली शिरपूर बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी माल विक्री व्यवहारांसाठी साईबाबा मंदिराजवळ शेड उभारले. मात्र आज त्या शेडवर काही व्यापाऱ्यांचा बेकायदेशीर ताबा असून, तिथे त्यांनी पॉलीश मशिन्स बसवून आपला खरेदी केलेला माल साठवून ठेवला आहे. बाजार समितीने त्यांना वीज कनेक्शनही देऊन अधिकृतपणा बहाल केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
उन्हाळ्यात किंवा सध्या सुरू असलेल्या पावसात शेतकऱ्यांना उघड्यावर शेतमाल सौद्याला लावावा लागत आहे. व्यापाऱ्यांच्या दादागिरीमुळे शेतकऱ्यांचे वाहन शेडमध्ये उभेही राहू दिले जात नाहीत. परिणामी, पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा माल खराब होऊन आर्थिक नुकसान होत आहे.
शेतमाल विक्री केल्यानंतर 24 तासांत शेतकऱ्यांना पेमेंट देणे बंधनकारक असतानाही महिनाभर शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत. पेमेंटची मागणी केल्यास व्यापारी खुलेआम धमकी देतात — "लिलावच करणार नाही", "जेव्हा आमच्याकडे पेमेंट येईल तेव्हाच देऊ." यावर शेतकरी आवाज उठवताच बाजारच 8-10 दिवस बंद केला जातो. यामुळे शेतकऱ्यांची मानसिक, आर्थिक व शारीरिक पिळवणूक होत आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बाजार समितीचे संचालक मंडळ या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. मार्केटमध्ये शेतमाल आणण्याचे आवाहन करणाऱ्या नेत्यांचे व संचालक मंडळाचे प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होते आहे, ही फार मोठी शोकांतिकाच आहे.
शिरपूर बाजार समितीमधील या अराजकतेमुळे शेतकरी आपला माल धुळे, आमळनेर, दोंडाईचा, नंदुरबारसारख्या इतर बाजार समित्यांमध्ये विक्रीस नेत आहेत. यामुळे शिरपूर बाजार समितीच्या उत्पन्नावरही परिणाम होतो आहे. समितीचे उत्पन्न घटल्यामुळे दीर्घकालीन वित्तीय धोरणांवरही परिणाम होऊ शकतो.
शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे खालील तातडीच्या मागण्या लावून धरल्या आहेत:
साईबाबा मंदिराजवळील शेतकरी शेडव्यापाऱ्यांकडून त्वरित रिकामे करून घ्यावेत. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या मालाचे पेमेंट 24 तासांत द्यावे, आणि विलंब करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.त्या जागेचा कोणत्याही इतर हेतूसाठी वापर होऊ नये.
या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास, शेतकऱ्यांना बाजार समितीसमोर आंदोलन करावे लागेल, आणि त्याची पूर्ण जबाबदारी मार्केट कमेटीच्या संचालक मंडळावर राहील, असा इशाराही एडवोकेट गोपाल राजपूत मोहन पाटील आणि शेतकऱ्यांनी दिला आहे.
शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची भूमिका ही शेतकऱ्यांच्या हितासाठी असायला हवी होती. पण येथे व्यापाऱ्यांच्या दबावापुढे शेतकरी भरडला जात आहे. हे केवळ कारभारातील हलगर्जीपणाचे नाही, तर व्यवस्थाच बिघडल्याचे लक्षण आहे. आता शेतकऱ्यांनी आवाज उठवला आहे, पण यावर त्वरित उपाय झाले नाहीत, तर हा असंतोष मोठ्या संघर्षात परिवर्तित होईल.